Pimpri : कैरीचे पदार्थ बनविण्यासाठी गृहिणींची लगबग

पिंपळे गुरव : उन्हाळ्यात मनुष्य सतत पाणी पित असतो. त्यामुळे त्याचे पोट पाण्यानेच भरते. परिणामी काही खाण्याची इच्छा राहत नाही. अशात कैऱ्या दिसल्या की, तोंडाला पाणी सुटते. या आंबट कैऱ्या तोंडाची चव वाढवतात. त्यामुळे बाजारपेठेत कच्च्या कैऱ्यांना मागणी वाढली आहे. कैरीच्या दर्जानुसार ५० ते ८० रु. किलो दराने त्या मिळत आहेत. कैरी बाजारात आल्यापासून महिला त्यापासून विविध चवदार पदार्थ तयार करण्यास सुरुवात करतात. यात लोणचे व पन्ह्याला पसंती दिली जाते.
कच्च्या कैरीपासून आंबट गोड लोणचे, तेल घातलेले लोणचे, कैरी व पुदिन्याची चटणी, कांदा व कैरीची चटणी, कैरीची डाळ, साखरआंबा, मेथीआंबा, ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांसाठी कच्च्या कैरीचे सरबत असे विविध खाद्य पदार्थ तयार करण्यास सध्या सुरुवात झाली आहे. कैरी ही चवीला आंबट व शरीरासाठी थंड असते.
भाज्यांसह विविध खाद्य पदार्थांमध्ये ती घातल्यामुळे जेवणाची चवही वाढते. सोबतच उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील जे आवश्यक घटक बाहेर पडतात. त्यांची उणीव भरून काढण्याचे काम कैरी करीत असल्यामुळे ती जीवनसत्व अ, क, ड, बध, पोटॅशियम, मॅग्नेशियम युक्त शरीरासाठी उपयोगी असल्याची माहिती आहारतज्ज्ञांनी दिली आहे. कैरीचे काप करून ते तसेच खाल्ले किंवा त्याला तिखट मीठ लावून खाल्ले तरी तोंडाला चव येते. मात्र, कैरी खाण्याआधी ती स्वच्छ पाण्याने चांगली चोळून धुवून घ्यावी. कारण, बाजारात त्यावर विविध प्रकारचे विषाणू बसतात.
तसेच त्यातून निघणाऱ्या तेलालाही अनेक पदार्थ चिकटलेले असतात. कैरी उकडून त्याचा गर काढून तो साखरेत शिजवून थंड केला तरी त्यापासून तत्काळ पन्हे, शरबत तयार करता येते. किंवा जॅम म्हणून ते पोळीसोबतही खाता येते. त्यामुळे सध्या गृहिणींची कैरीचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी धावपळ सुरू आहे. विशेष बाब म्हणजे कैरी बाजारात आल्यानंतर तिचा रोजच्या जेवणात वापर हा कोणत्या ना कोणत्या खाद्य पदार्थांच्या रूपात होत असतो. त्यामुळे शरीरातील विविध जीवनसत्वांसह पोषण देणाऱ्या आवश्यक पदार्थाची उणीव भरून निघते.
कच्च्या कैऱ्या या जीवनसत्व अ, क, ड व बध तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियमचे भांडार आहेत. उन्हाळ्यात कैरीचे पन्हे, कच्च्या कैरीचे शरबत प्यायल्याने उन्हाचा त्रास कमी होतो. सतत घाम येत असल्याने शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घाबरल्यासारखे वाटते. कैरीचे पदार्थ खाल्याने शरीराला तरतरी येते.
– डॉ. वैशाली भोर, आहारतज्ज्ञ.





