Pimpri : तळेगाव एसटी बस डेपोतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

तळेगाव दाभाडे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मेधावीण फाउंडेशनच्या वतीने तळेगाव दाभाडे एसटी डेपोतील (आगार) कार्यरत असणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शनिवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी तळेगाव आगारात जाऊन तिथे कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार केला. यावेळी फाऊंडेशनच्या स्वाती पवार, मीरा म्हस्के, जयश्री पाटील, सुनीता अगरवाल, मीनल गोळे, अमृता भेगडे उपस्थित होत्या.
वैशाली दाभाडे यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरण याबद्दल मार्गदर्शन करताना फाऊंडेशन करीत असलेल्या शैक्षणिक, आरोग्य व महिला सक्षमीकरण कार्याची माहिती दिली.
यावेळी तळेगाव आगार प्रमुख प्रमोद धायतोंडे, उपप्रमुख मीना पोटे, लेखापाल नेहा टाक, वरिष्ठ लिपिक रोमा काकडे, लिपिक प्रज्ञा पंदारे आदी महिला कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक प्रमोद नखाते यांनी केले, तर आभार स्वाती पवार यांनी मानले.





