Pimpri : ग्रामीणची ठाणी आयुक्तालयास जोडण्यास गृहविभागाचा नकार?

लोणावळा : मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या चार पोलीस ठाण्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडण्याच्या प्रस्तावावर गृह विभाग सकारात्मक नसल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीत पर्यटकांसाठी नव्याने पर्यटक पोलीस ठाणे सुरू करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार हा भाग पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेर राहणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मावळातील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चारही ठाणी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अखत्यारित असून मागील अनेक दिवसांपासून ही सर्व ठाणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडली जाणार असल्याची चर्चा आहे. तसा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविल्याची माहिती आहे. परंतु सरकारच्या नव्या निर्णयाने हा भाग ‘जैसे थे’ म्हणजे पुणे ग्रामीण दलाकडे राहील, अशी चिन्हे दिसत आहे.
१५ ऑगस्ट २०१८ रोजी पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. सुरुवातीला आयुक्तालयाच्या हद्दीत १४ पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली, रावेत, शिरगाव व म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. काही महिन्यांपूर्वी वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर व दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. सध्या आयुक्तालयांतर्गत २२ पोलीस ठाणी आहेत.
एकीकडे आयुक्तालय हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना अपयश येत असतानाच ग्रामीण हद्दीतील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविल्याची माहिती समोर आली. या प्रस्तावाला मावळ तालुक्यातून मोठा विरोध झाला होता. त्यानंतर हा प्रस्ताव आता बारगळला असून पुणे ग्रामीण दलाकडे असलेला मावळातील चारही पोलीस ठाण्यांचा कारभार तसाच सुरू राहील, असे बोलले जात आहे.
आयुक्तालयाकडे अगोदरच अतिभार…
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ जवळपास ११५ चौरस किमी असून अंदाजे ४० लाख लोकसंख्या आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीणपेक्षा भौगोलिकदृष्ट्या पिंपरी-चिंचवडची हद्द मोठी आहे. पिंपरी-चिंचवड शहर, बावधन, बालेवाडी, ग्रामीणमधील चाकण, खेड, आळंदी, तळेगाव दाभाडे हा परिसर आयुक्तालयांतर्गत येत आहे. आळंदी-मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्रे आयुक्तालयाच्या अखत्यारित येतात. सध्या आयुक्तालयाकडे असलेल्या या भागातही पायाभूत सुविधा, ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची कमतरता आहे. तसेच गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांना पकडण्यात अडचणी येतात. अशात नवा भाग आयुक्तालयास जोडल्यास तिथे पिंपरी-चिंचवड पोलीस किती यशस्वी होईल, ही शंका आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाची कामगिरी
मागील काही वर्षांपासून ग्रामीण हद्दीत पुणे ग्रामीण पोलीस दलाची कामगिरी ही वाखण्याजोगी राहिली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाने ग्रामीण भागातील ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त वाढविली आहे. सोबत ग्रामरक्षक दलाची याकामी मदत होते. सोबत तडीपार, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागात गुन्ह्यांनी घट झाल्याचा दावा ग्रामीण पोलिसांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर सध्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कुठलाही बदल करण्यास गृहविभाग अनुकूल नसल्याचे समजते.





