Pimpri : कान्हे उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा
कान्हे : मावळ तालुक्यातील मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयात महत्वाची व दिलासादायक सुविधा सुरू करण्यात आली आहे.
गुरुवारपासून (दि. १५ मे) येथे मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. ही उपयुक्त सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, आमदार सुनील शेळके, पॉस्को, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि जी.के. फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आली आहे.
सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णालयात डायलिसीस उपचार सेवा उपलब्ध असेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना त्यांच्या उपचारांसाठी यामुळे मोठा आधार मिळणार आहे. ही सेवा मावळमधील सर्व नागरिकांसाठी खुली असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.
उपचारासाठी येण्यापूर्वी ८०८०३४६२३४ क्रमांकावर संपर्क करून रुग्णाच्या आजाराची माहिती द्यावी आणि अपॉइंटमेंट घेऊन रुग्णालयात यावे. तसेच रुग्णाने येताना आजारासंबंधीचे सर्व वैद्यकीय अहवाल, रेशन कार्ड, आधार कार्ड घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





