Pimpri : नामांकित कंपनीचे दीड लाखांचे बनावट कपडे जप्त

पिंपरी : अंडरआर्मर कंपनीच्या नावाचा आणि लोगोचा वापर करून बनावट कपडे विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी येथील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.10) सायंकाळी मेगा फॅशन या दुकानात करण्यात आले.
पुरन रंगलाल बोरवाल (45, रा. कोथरुड पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल रत्नप्पा पुजारी (32, रा.मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज तीन येथे मेगा फॅशन या दुकानामध्ये अंडरआर्मर कंपनीचे नाव आणि लोगो लावून बनावट कपडे विक्री होत असल्याची माहिती पुजारी यांना मिळाली. पुजारी हे अंडरआर्मर कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देत दुकानामध्ये कारवाई केली. या कारवाईमध्ये एक लाख 44 हजार 800 रुपये किमतीचे बनावट ट्रॅक पॅन्ट टि-शर्ट, शॉर्ट व जॅकेट असे कपडे जप्त करण्यात आले आहेत.





