Pimpri : पिंपरी बाजारपेठेतील अतिक्रमणाचे ग्रहण

पिंपरी : पिंपरी बाजारपेठेतील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुकानासमोर वाहन पार्क करू नये म्हणून पूर्वी लोखंडी जाळ्या ठेवत असे. आता मात्र त्याची जागा सिमेंटच्या कट्ट्यांनी घेतली आहे. पदपथावरच नव्हे तर रस्त्यावर थेट फर्निचर विक्री केली जात आहे. मात्र महापालिकेचे अधिकारी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पिंपरी बाजारपेठेला लागलेले अतिक्रमणाचे ग्रहण कधी सुटणार, याकडे ग्राहक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी बाजारपेठेत दिवसभरात हजारो ग्राहक येतात. येथील दुकानदारांना ग्राहक हवे असतात. मात्र त्यांची वाहने नको असतात. आपल्या दुकानासमोर वाहने पार्क करू नयेत म्हणून यापूर्वी दुकानदार आपल्या दुकानासमोर लोखंडी जाळ्या ठेवत असे. आजही काही दुकानासमोर लोखंडी जाळ्या दिसून येतात. मात्र महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक या लोखंडी जाळ्या उचलून नेत असे. यावर दुकानदारांनी नामी शक्कल लढविली आहे. दुकानासमोर रस्त्यावर थेट सिमेंटचे कट्टे बसविले आहेत. जरी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आले तरी ते सिमेंटचे कट्टे उचलून नेऊ शकत नाहीत. हे कट्टे काढण्यासाठी महापालिकेला थेट जेसीबी आणावा लागणार आहे.
पदपथावर उभारले फलक अन् पुतळे
बाजारपेठेत फेरफटका मारताना अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानातील साहित्याचे फलक पदपथे आणि रस्त्यावरही उभारल्याचे दिसून येते. एका दुकानदाराने आपल्या दुकानाजवळ असलेल्या महावितरणच्या डीपीचा फायदा घेत संपूर्ण पदपथावर शोरूममधील पुतळे आणून ठेवले आहेत. यामुळे ग्राहकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते.
बेशिस्त चालक आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
सध्या डेअरी फार्म येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील वाहने पिंपरीतील साई चौकातून येतात. यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडते. त्यातच काही दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक बेशिस्तपणे रस्त्यावरच आपली वाहने उभी करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शगुन चौक आणि साई चौक येथे वाहतूक पोलीस असतात. त्यांना चौकात वाहतूक कोंडी होऊ नये याची जबाबदारी असते. मात्र तरीही ते या दोन चौका दरम्यान बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. वाहतूक पोलीस याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. कारवाईच्या नावाखाली केवळ ऑनलाइन दंडात्मक कारवाई होते, यामुळे येथील वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे.
व्यापार्यांचा कारवाईला विरोध
अनेकदा महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाईला आले असता येथील व्यापारी एकत्र येत कारवाईला विरोध करतात. यापूर्वी अनेकदा रस्ता रोको आंदोलनही झाले आहे. तसेच वाहतूक पोलिसांनाही कारवाई करताना अडथळे निर्माण करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेपही होतो. सर्वासमक्ष पोलिसांवर थेट लाचखोरीचा आरोप केला जातो.
समविषम पार्किंगची गरज
शगुन चौक ते साई चौक या दरम्यान नेहमीच वाहतूक कोंडी होते. तसेच या भागात नेहमीच वाहने पार्किंग केली जातात. यामुळे महापालिकेच्या कर्मचार्यांना साफसफाई करता येत नाही. जर महापालिका आणि वाहतूक पोलीस यांनी या रस्त्यावर समविषम पार्किंग केली तर साफसफाईचा प्रश्न सुटेल आणि वाहतूक कोंडीही होणार नाही. मात्र स्थानिक व्यापारी या समविषम पार्किंगला विरोध करतील.





