Pimpri : पर्यटकांना चांगली सेवा देऊन आर्थिक प्रगती साधावी – आ. शेळके

पवन मावळ : पवना धरण परिसरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यासह देशविदेशातील पर्यटक येत असतात. मागील काही वर्षांपासून या भागात पर्यटन व त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी येण्यासाठी चांगले सुसज्ज रस्ते, परिसरात वैद्यकीय सेवा सोबत पर्यटन वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असुन पर्यटकांना चांगल्याप्रकारे सेवा देऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.
पवना कृषी पर्यटन विकास संस्थेच्या वतीने कृषी पर्यटन व्यवसायिकांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शेळके बोलत होते. मावळला मोठे निसर्ग सौंदर्य लाभले आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये याठिकाणी गर्दी पाहायला मिळते. मावळच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन यामुळे पर्यटकांना होत असते, असेही शेळके म्हणाले.
याप्रसंगी पवना कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मोहोळ, उपाध्यक्ष किसन खैरे, खजिनदार संजय मोहोळ, सचिव रवि ठाकर, संचालक दत्तात्रय ठाकर, नारायण बोडके, सुधीर घरदाळे, नारायण ठाकर, संतोष कडू आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोहोळ यांनी केले. आभार रवि ठाकर यांनी मानले.
चुकीचे वागल्यास पाठीशी घालणार नाही
पर्यटनात वाढ होत असताना आपल्या व्यवसायामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही, स्थानिकांना त्रास होणार नाही, याची खबरदार घ्यावी. प्लॅस्टिकचा वापर टाळावा, सांडपाणी व्यवस्थापन करावे, चांगली सेवा देण्याची स्पर्धा करावी. परिसरात धनदांडगे अलिशान बंगल्यात पर्यटन करत आहेत, यावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. गैरप्रकारांना रोखण्यासाठी पवना कृषी पर्यटन विकास संस्थेने घालुन दिलेल्या नियम अटींचे पालन करावे. चुकीचे वर्तन केल्यास कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे मार्गदर्शन शेळके यांनी उपस्थितांना केले.





