Pimpri : ड्रेनेजचे काम जोरात ; नागरिकांची सुरक्षा मात्र धोक्यात !

खालापूर : खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून चौक बाजारपेठेची ओळख आहे. या बाजारपेठेमध्ये दिवसभर हजारो नागरिकांची वर्दळ असते. सध्या मात्र बाजारपेठेमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य बाजारपेठ भागात ड्रेनेज लाइनचे काम सुरू असून हे काम करणाऱ्या ठेकेदाराने याठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसते.
कामाच्या ठिकाणी मोठे खड्डे घेतले असून लोखंडी रॉड, सळया विखुरलेल्या अवस्थेत आहेत. अशावेळी ड्रेनेज लाइनचे काम जिथे सुरू आहे तिथे बाजूला कोणतीही पट्टी लावलेली नसून कुठलाही फलक निदर्शनास येत नाही. सुरक्षिततेसाठी दोरी, पट्टी नसल्याने पायी चालणारे आणि वाहन चालक यांनाही नेमका अंदाज येत नाही, यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.
ठेकेदाराच्या या निष्काळजी, बेजबाबदार कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात असून ड्रेनेजचे काम सुरू असताना कोणताही अपघात घडल्यास आणि सामान्य नागरिकाच्या जीवास अपाय झाल्यास, त्याची जबाबदारी ठेकेदार व संबंधित प्रशासन विभागाची असेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
चौक मधील मुख्य बाजारपेठ भागातील ड्रेनेजची दयनीय अवस्था पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला. परंतु गेली कित्येक महिन्यांपासून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. एकीकडे काम कित्येक दिवस बंद राहते, तर दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना न केल्याने ठेकेदाराबद्दल व प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.





