Pimpri : उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा

देहूगाव : श्री संत तुकाराम महाराज यांचा ३४०वा आषाढी पायी वारी पालखी सोहळा अनुषंगाने वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुख्य मंदिराच्या दर्शनबारी सभागृहात शुक्रवारी (दि. ३०) उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी तहसीलदार जयराज देशमुख, देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे यांसह वैभव महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, अभिजीत मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे, प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, नगराध्यक्षा पूजा दिवटे यांसह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सदर बैठकीत दैनिक प्रभातमध्ये शुक्रवारीच प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत देहूगाव ते देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याचा प्रश्न संस्थानने मांडला. त्यावर, सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली. यासह देहूगाव ते देहूफाटा (येलवाडी) दरम्यानचा नादुरुस्त रस्ता दुरुस्त करणे, अलगदशहावली दर्ग्याजवळील चौकातील कापूर ओढा पुलावरील तुटलेले कठडा दुरुस्त करणे, विद्युत पुरवठ्याचे नियोजन करणे, शुद्ध पाणीपुरवठा संदर्भातील प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आले, त्यावर चर्चा होऊन नियोजन करण्यात आले.
यावेळी तीर्थक्षेत्र देहूमध्ये वर्षातून तीन वेळा मोठ्या यात्रा भरतात. यात्रा काळातील कामे तात्पुरती न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची सूचना माजी विश्वस्त अभिजीत मोरे यांनी मांडली, त्याला सर्वांनीच समर्थन दिले.
अखंड विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा व्यवस्थापन करणे, आरोग्याची व्यवस्था, औषधोपचार सुविधा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, पालखी रथ आणि वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी, शासकीय विभागाने समन्वय साधून रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवणे, दुतर्फा मुरूम टाकणे, आपत्ती पूर्वनियोजन करणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नियंत्रण कक्ष तयार करून सर्व विभागातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला उपजिल्हाधिकारी डॉ. माने यांनी दिल्या.





