पिंपरी | शहरातील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल पाडा; रेल्वे विभागाचे महापालिकेला पत्र

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ असणा-या पिंपरी कॅम्पात जाण्यासाठी रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेला इंदिरा गांधी उड्डाणपूल आणि चिंचवड स्टेशन येथील पुणे-मुंबई महामार्गावरुन चिंचवड गावात जाण्यासाठी असलेल्या उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे. हे दोन्ही उड्डाणपूल पाडण्यात यावेत, असे पत्र रेल्वे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाठवून दिले आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरुन पिंपरी कॅम्पात जाण्यासाठी पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावर पिंपरी येथे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. हा शहरातील सर्वात पहिला उड्डाणपूल असून त्याची इंदिरा गांधी उड्डाणपूल असे ओळख आहे. या पुलाचे आयुष्य संपले असून बांधकाम धोकादायक स्थितीत आहे.
तरी, हा पूल वाहतुकीस बंद करुन तातडीने पूल पाडून टाकावा, असे पत्र रेल्वे विभागाने महापालिकेस तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात पाठविले होते. तरी, महापालिकेने शहरातील दोन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल पाडण्याऐवजी त्याचे स्ट्रक्चरल ओडीट करुन दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम सुमारे २ ते ३ वर्षे सुरू होते.
त्याचबरोबर पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन येथील रेल्वेमार्गावरुन चिंचवडच्या दिशेने जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुलाचे बांधकाम धोकादायक झाले असून, हा पूल देखील तातडीने पाडण्यात यावा, पत्र रेल्वेने महापालिकेस नुकतेच दिले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने सुमारे १५ वर्षांपूर्वी समांतर पूल बांधला आहे. जुना पूल तोडावा लागणार असल्याने येथील वाहतूक समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
पालिकेने केले पुलाचे मजबुतीकरण
पुणे-मुंबई महामार्गावरुन चिंचवड गावठाणात जाण्यासाठी असणारा चिंचवड स्टेशन येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल पाडण्याबाबत रेल्वे प्रशासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल पाडण्याबाबत देखील असेच रेल्वेचे पत्र यापूर्वी पालिकेला मिळाले आहे. पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. पुल पाडण्याबाबत आयुक्तांसोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्यास मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दुजोरा दिला आहे.





