पिंपरी | देहूच्या महाप्रवेशद्वाराची रंगरंगोटी करण्याची मागणी

देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू मुख्य महाप्रवेशद्वाराचा रंग धुसर होत असून रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्तीची कामे होणे गरजेचे आहे. ह्मा कामाकडे प्रशासन, सेवाभावी संस्थानी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. “अणु रेणु या थोकडा तुका आकाशा एवढा ” या अभंग उक्तीप्रमाणे तीर्थक्षेत्र देहू येथे श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीचे विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि लोकवर्गणीतून भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात आली आहे.
या प्रवेशद्वाराची पायाभरणी ३ फेब्रुवारी १९९३ रोजी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम विजयादशमी दिवशी २६ आक्टोबर २००१ सुरू झाले. श्री संत तुकाराम महाराज ३१८ व्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यादिनी ३ जुलै २००३ रोजी लोकार्पण सोहळा झाला.
प्रवेशद्वाराची लांबी २४ मीटर व रुंदी ९ मीटर तर उंची २१ मीटर आहे. जमिनीपासून कळसाची उंची २६ मीटर असून या कमानीच्या मंदीरावरील कळसासह ६ कळस, १८ घंटया, २ समई आणि भागवत धर्माची पताका आहे. हे प्रवेशद्वार तीर्थक्षेत्र देहूचे वैभव असून देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसह पर्यटक आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी भाविकांना आकर्षित करीत आहे.
प्रवेशद्वाराचा रंग धुसर झाला आहे. कमानीवर असलेल्या प्रवेशद्वार नावातील ” दा ” अक्षर तर १८ घंटयातील ६ घंटे निखळून पडले आहे. पताका खांबाची चकाकी कमी झाली असून त्यावरील भागवत धर्माची असणारी पताकाही खराब झाली आहे. कळस काळसर झाला आहे. कमानीवर जाण्यासाठी असणारी लोखंडी शिडी ही गंजली आहे.
प्रवेशद्वाराचे विद्रुपीकरण
प्रवेशद्वाराजवळ टपऱ्या, हातगाड्या, पथारीधारकांची अतिक्रमणे वाढले असून खांबावर विविध व्यावसायिक जाहिराती चिकटवल्या जात आहेत. तसेच बॅनर, फ्लेक्स व विविध संघटना आणि संस्थाच्या नामफलकांमुळे महाप्रवेशद्वाराचे विद्रूपीकरण झाले आहे.





