Pimpri : कडक उन्हामुळे शीतपेयांना मागणी वाढली

पिंपरी : उन्हाळा सुसह्य करण्यासाठी शीतपेयांना मागणी वाढली आहे. रस्त्याच्या कडेला रसवंतीगृह, कुल्फी विक्रेत, मसाला ताक, या दुकानांवर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. परंतु शीतपेयांची मागणी वाढताच दर देखील वाढले आहेत. विशेषत: बंद पाकिटांमध्ये मिळणारे ताकदेखील महाग झाले आहे. अवघ्या 400 मिली ताकासाठी नामांकित दूध डेअर्या 20 रुपये आकारत असून गायीचे दूध 56 रुपये लिटर तर ताक 50 रुपये लिटर झाले आहे.
गेल्या काही दिवसांत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ताक, लिंबू सरबत, उसाचा रस, सरबत, आइस्क्रीम, आदी थंड पेयांना मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरातील रहदारीच्या विविध चौकांसह प्रमुख चौक व अंतर्गत भागातही परिसरात शीत पेयांची दुकाने थाटल्याचे चित्र दिसून येत आहे.उन्हामुळे रसवंतीच्या दुकानातही मोठी गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
उसाचा रस 10 ते 20 रुपये प्रती ग्लास या दराने मिळत आहे. तसेच थंड पाण्याच्या बाटल्या, मठ्ठा, ताक, ज्यूस, बर्फ गोळा, कुल्फी, फळे, फळांच्या फोडअशा वेगवेगळ्या प्रकारची दुकाने अनेक परिसरात थाटली आहेत. दूधापासून बनणाऱ्या विविध पदार्थांमध्ये सर्वांत अखेरचा पदार्थ ताक समजला जातो. आरोग्यासाठी ताक गुणकारी असल्याने पूर्वी खूपच स्वस्त असणारे ताक दूध डेयऱ्यांना आता खूपच महाग केले आहे. 400 मिली ताकाचे पाकिट २० रुपयांना मिळत आहे. तर स्नॅक्स सेंटर आणि हाॅटेलमध्ये ८० ते १०० मिली ताकाचा ग्लास १५ ते २० रुपयांना विकला जात आहे.
नागरिकांची आइस्क्रीमला पसंती मिळत असून, अनेक जण रात्री परिवारासोबत बाहेर पडून विविध प्रकारच्या आइस्क्रीमचा आनंद घेताना दिसून येत आहेत. शहरात अनेक ठिकाणी जलजीराच्या गाड्या थाटण्यात आल्या आहेत. साधारणपणे 10 ते 20 रुपयांना हे पेय उपलब्ध आहे. तर बाजारात विविध रंग चवीचे बर्फाचे गोळे उपलब्ध आहेत.
सायट्रिक अॅसिडचा वाढता वापर
बाटली बंद लिंबू सरबत आणि पाकिटबंद ताकामध्ये सायट्रिक अॅसिडचा वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे. सायट्रिक अॅसिडचा वापर सामान्यतः ताकाचा आंबटपणा वाढवण्यासाठी किंवा ताकातील चव सुधारण्यासाठी केला जातो. सायट्रिक ऍसिड एक नैसर्गिकरित्या आढळणारे आम्ल आहे, जे लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळते. सध्या पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने कमीत कमी मूळ पदार्थात पाणी आणि सायट्रिक अॅसिडचा अधिक वापर करुन या उत्पादनांचे प्रमाण वाढविले जात असल्याचे दिसून येत आहे. सायट्रिक अॅसिडचा अतिरिक्त प्रमाणात वापर देखील आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतो. प्रतिनग लिंबाचा दर 10 रुपयांवर पोहोचला असताना, बाटलीबंद थंडगार लिंबु सरबत मात्र दहा रुपयांना मिळत असल्याने, यामध्येदेखील रसायनांचा वापर केला जात असल्याची शंका उपस्िथत केली जात आहे. या शीतपेयांची अन्न व औषध विभागाकडून तपासणी होणे गरजेचे आहे.





