Pimpri Crime : पिंपरी चिंचवडमध्ये २४ तासांत दोन खून! वाढत्या गुन्हेगारीने नागरिकांत भीतीचे सावट

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या २४ तासांमध्ये दापोडी आणि चाकण येथे खुनाच्या घटना उघडीकस आल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.खुनाची पहिली घटना ही दापोडी येथे शुक्रवारी (दि. ३) रात्री उघडकीस आली. शेखर भालेराव (वय २४ रा. दापोडी) असे खून झालेल्या मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शेखर यांच्या वडिलांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गौरव गायकवाड आणि अजय खरात या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता. याच जुन्या वादातून दोन आरोपींनी शेखर भालेराव या तरुणावर दापोडीतील आत्तार वीट भट्टी येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास कोयत्याने वार करीत त्याचा खून केला. दापोडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
खुनाची दुसरी घटना चाकण जवळील कडाचीवाडी येथे घडली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडाचीवाडी येथे गवतात एका ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आढळून आला. मयत तरुणावर धारदार शस्त्राने वार केले आहेत.
मात्र मृताची ओळख पटेल असे कोणतेही कागदपत्र त्याच्याकडे आढळून आले नाहीत. तसेच ओळख पटेल अशी कोणतीही निशाणी त्याच्या शरिरावर नाही. याप्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





