Pimpri Crime | कत्तलखान्यात जाण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई ; दोन गायींची सुटका

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी दोन जर्सी गायींची दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. ७) दुपारी किवळे येथील समीर लॉन्सजवळ करण्यात आली.याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश कदम यांनी रविवारी (दि. ७) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद गजानन जाधव (वय ३६, रा. रहाटणी) आणि बाळा पवार (रा. चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत पोलिसांना पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली की, एका वाहनातून गायींची वाहतूक केली जात असून त्यांना कत्तलखान्यात नेले जात आहे. त्यानुसार रावेत पोलिसांनी कारवाई करत एक टेम्पो पकडला. त्यातून ३० हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गायींची सुटका केली. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





