Pimpri Crime: दिवसाढवळ्या पान टपरी चालकावर कोयत्याने हल्ला! सिगारेटच्या बहाण्याने आले अन्..

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – दोन अनोळखी चोरट्यांनी पान टपरी चालकावर रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेत कोयत्याने वार केले. ही मंगळवारी (दि. २) दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास साईबाबा मंदिराशेजारी, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.कल्पेश बिचिशन धनवे (रा. विठ्ठलनगर, पिंपरी, पुणे) व त्याचा साथीदार आयुष (पूर्ण नाव-पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दरबान मोहन सिंग (वय ३५, रा. शीतलबाग क्यू बिल्डींग, फ्लॅट क्र. ३०२, भोसरी) असे कोयत्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पान टपरी चालकाचे नाव असून त्यांनी मंगळवारी याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुकानात असताना आरोपी सिगारेट पिण्याच्या बहाण्याने दुकानात आले.
त्यांनी सिगारेट घेतल्यावर ५०० रुपयांची नोट देत सुट्टे मागितले. गल्ला उघडताच आरोपींपैकी एकाने कमरेला लावलेला कोयता काढला तर दुसऱ्याने गल्ल्यातील ५०० रुपयांची नोट जबरदस्तीने हिसकावली. फिर्यादीने विरोध करताच आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत कोयत्याने मानेवर वार केला. हल्ल्यानंतर दोघेही आरोपी पळून गेले. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.





