Pimpri Crime : सायबर टोळीचा पर्दाफाश!फेसबुक जाहिरातीतून २५ कोटींचा गंडा ; मागे होतं आंतरराष्ट्रीय रॅकेट

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवून १५० नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी पाचजण चिनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांच्या संपर्कात राहून भारतात सायबर फसवणूक करून मिळालेली रक्कम क्रिप्टो आणि युएसडीटीच्या माध्यमातून पाठवत होते. तर त्यांच्याकडून हवाला, मनी ट्रान्सफर, इतर मार्गाने कमिशन घेत होते. या टोळीने तब्बल १५० ते १६० नागरिकांची सुमारे २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
यश भारत पाटोळे (२५, न्यु पॅलेस, कोल्हापुर), अब्दुल माजिद शेख (३४, उंड्री, पुणे), मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहरेहुन (३०, पटणा, बिहार), माझ अफसर मिर्झा (२४, स्वारगेट, पुणे), हुसेन ताहीर सोहेल शेख (२३, संभाजीनगर), बाबुराव शिवकिरण मेरु (४१, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.फार्मा कंपनीत प्रोग्रामर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची फेसबुकवरील जाहिरातीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. आरोपींनी एका बँक खात्यावर ३३ लाख ८६ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार पोलिसांनी बँक खात्याची माहिती घेत यश पाटोळे याची ओळख पटवली. तो पुणे शहरातील कोंढवा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांची याला ताब्यात घेतले. त्याचे साथीदार कोंढवा येथील एका हॉटेल मध्ये बसून चिनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांशी संपर्क साधत सायबर गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ मोबाइल फोन, १५ सिमकार्ड, चार सीसीटीव्ही, आठ चेक बुक, २० एटीएम कार्ड, एक लॅपटॉप, एक मेमरी कार्ड, एक पासपोर्ट आणि १३ हजार ५५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
आरोपी फसवणुकीची रक्कम क्रिप्टो करन्सी आणि युएसडीटी मध्ये कन्व्हर्ट करून ती चीन मधील आरोपींना पाठवत असत. त्यांच्याकडून मिळणारे कमिशन ते हवाला, मनी ट्रान्सफर आणि इतर माध्यमातून स्वीकारले. त्यांनी आता पर्यंत १५० ते १६० नागरिकाची अंदाजे २० ते २५ कोटी रूपयाची फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे.




