Bitcoin Price Fall: जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय आणि महागडी डिजिटल करन्सी असलेल्या ‘बिटकॉइन’च्या (Bitcoin) किमतीत गेल्या काही दिवसांपासून मोठी पडझड पाहायला मिळत आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी विक्रमी उच्चांकावर असलेल्या बिटकॉइनमध्ये आता कमालीची घसरण झाली असून, यामुळे संपूर्ण क्रिप्टो मार्केटमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑल टाइम हायवरून ४५ टक्क्यांची घसरण – क्रिप्टोची किंमत ट्रॅक करणाऱ्या वेबसाईटनुसार, बिटकॉइनने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी $126,198.07 (सुमारे १.१४ कोटी रुपये) हा आपला आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर (All Time High) गाठला होता. मात्र, तिथून आतापर्यंत यात सुमारे ४५.८६% घसरण झाली आहे. आज, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:२२ वाजेपर्यंत बिटकॉइनचा दर $66,195.15 (सुमारे ६० लाख रुपये) वर आला आहे. म्हणजेच चार महिन्यांत एका बिटकॉइनची किंमत तब्बल ५४ लाख रुपयांनी कमी झाली आहे. घसरणीची प्रमुख कारणे काय? तज्ज्ञांच्या मते, या मोठ्या घसरणीमागे अनेक जागतिक आणि तांत्रिक कारणे आहेत. मार्केट लेव्हरेज आणि नफा वसुली: Giottus चे CEO विक्रम सुब्बुराज यांच्या मते, २०२५ च्या अखेरीस आलेल्या तेजीनंतर बाजार आता स्थिर होत आहे. फ्युचर्स मार्केटमधील ओपन इंटरेस्ट कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुली (Profit Booking) केल्यामुळे किमतीवर दबाव आला आहे. हेही वाचा – Best FD Rates: मुदत ठेवींवर 8.95% पर्यंत व्याज; फेब्रुवारी 2026 मध्ये ‘या’ बँका देतायत सर्वाधिक परतावा जागतिक मॅक्रो घटक: अमेरिकेतील बाँड यील्डमध्ये झालेली वाढ आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबाबत असलेली अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. लिक्विडिटी कमी झाल्यामुळे जोखीम असलेल्या मालमत्तेकडून गुंतवणूकदार आता सोने आणि ट्रेझरी यांसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. राजकीय आणि धोरणात्मक अनिश्चितता: CoinDCX चे वरिष्ठ उपाध्यक्ष पारस मल्होत्रा यांच्या मते, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनानंतर गुंतवणूकदारांना मोठ्या आशा होत्या, परंतु त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती आणि संशयाचे (FUD) वातावरण आहे. लिक्विडेशनचा दबाव: बायबिटचे कंट्री हेड विकास गुप्ता यांनी सांगितले की, किमतीत सुरुवातीला झालेल्या घसरणीमुळे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ‘लिक्विडेशन’ची मालिका सुरू झाली, ज्यामुळे किमती आणखी खाली गेल्या. इतर क्रिप्टोकरन्सीची स्थिती – बिटकॉइनच्या घसरणीचा परिणाम इतर ‘अल्टकॉइन्स’वरही (Altcoins) झाला आहे. दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी करन्सी एथेरियम (Ethereum) गेल्या एका महिन्यात ३९.८१% घसरली असून सध्या $1,983.82 वर व्यवहार करत आहे. गेल्या एका महिन्यात एक्सआरपी (XRP) यात २७.५% घसरण झाली असून याची किंमत $1.49 वर आली आहे. काय आहे बिटकॉइन आणि ब्लॉकचेन? बिटकॉइन ही एक विकेंद्रित (Decentralized) डिजिटल करन्सी आहे, जी कोणत्याही बँक किंवा सरकारद्वारे नियंत्रित केली जात नाही. हे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. ब्लॉकचेन म्हणजे एक प्रकारचे डिजिटल रजिस्टर, जिथे सर्व व्यवहार ‘ब्लॉक्स’च्या स्वरूपात साठवले जातात. हे जाळे जगभरातील हजारो संगणकांवर विखुरलेले असल्याने ते हॅक करणे अत्यंत कठीण मानले जाते. डिस्क्लेमर: क्रिप्टो मार्केटमधील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन आहे. वरील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.