Pimpri Crime : सततचा अपमान आणि शेवटी गळफास! वडमुखवाडीत आत्महत्येचं कारण ठरली सोसायटी

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – सोसायटी मधील सदस्यांनी वारंवार अपमानित करून मानसिक खच्चीकरण केल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 27) वडमुखवाडी येथे घडली.कैलास विलास भोसले (वय 42, रा. वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कैलास यांच्या पत्नीने रविवारी (दि. २८) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण कोलगे, विठ्ठल मारुती हरण, माधव कुंभार, गजानन पेड, दीपक सुरवसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण कोलगे आणि विठ्ठल हरण यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास भोसले यांनी आरोपींना वेळोवेळी सोसायटीच्या कामकाजातील चुका निदर्शनास आणून दिल्या होत्या. तरी देखील आरोपींनी त्या चुका न सुधारता कैलास यांना वेळोवेळी अपमानित करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. या त्रासाला कंटाळून कैलास यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





