Pune Crime News – लष्कर परिसरातील हॉटेल मुकेश येथे वाई येथील सराफ व्यापाऱ्याच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पियुष अशोक ओसवाल (२७) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष हा १७ जानेवारीपासून बेपत्ता होता. याबाबत वाई पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्राथमिक तपासात पियुष हा आर्थिक अडचणींमुळे तणावात होता. कर्जाच्या ओझ्यामुळे तो व्यथित असल्याने वाई येथून पुण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. पुण्यात आल्यानंतर तो लष्कर परिसरातील हॉटेल मुकेश येथे मुक्कामास होता. तपासात असेही समोर आले आहे की, पियुषने आपले सीमकार्ड बदलले होते. त्यामुळे त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत होत्या आणि नातेवाईक व पोलिसांना त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बराच वेळ खोलीतून कोणतीही हालचाल न दिसल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. खोलीत प्रवेश करताच पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत पियुषचा मृतदेह आढळून आला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण यांनी सांगितले की, मृताजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्याची तपासणी सुरू आहे.