Pimpri : सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज

अवसरी : पुणे जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळे लोप पावत चालले आहे. भोरवाडी अवसरी खुर्द येथील शिवसम्राट युवा प्रतिष्ठानने मोफत सामुदायिक विवाह सोहळा चळवळ पुढे चालू ठेवण्याचे अतिशय चांगले काम गेले पंधरा वर्षे सुरू ठेवले आहे. त्यामुळे तालुक्यातील गरजू कुटुंबीयांची लग्न मोफत होत असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
भोरवाडी (ता.आंबेगाव) येथे सहकार महर्षी दत्तात्रय गोविंद वळसे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि शिवसम्राट युवा प्रतिष्ठान यांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित शिवशंभो सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी सहा वधू वर यांचा साखरपुडा संपन्न झाला. या कार्यक्रमात या वधूवरांना शुभेच्छा देताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते. आजपर्यंत शिवसम्राट युवा प्रतिष्ठान भोरवाडी यांच्या वतीने सुमारे एकशे पंचाहत्तरपेक्षा जास्त विवाह पार पडले आहेत, अशी माहिती सामुदायिक विवाह सोहळ्याच्या वतीने देण्यात आली.
या वेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जयसिंग एरंडे, अरुण गिरे, रवींद्र कारंजखेले, सुनील बाणखेले, रामशेठ तोडकर, सुरेश भोर, माजी सरपंच जगदीश अभंग, सरपंच वैभव वायाळ, उपसरपंच प्रवीण भोर, आनंदराव शिंदे, सुषमा शिंदे, सभापती निलेश थोरात, शंकर पिंगळे, ग्रामस्थ, वऱ्हाडी उपस्थित होते.
या वेळी बालविवाह रोखण्यासाठी जेष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील यांच्या माध्यमातून वधू ,वर आणि ग्रामस्थ आणि नागरिकांनी शपथ घेतली. सुरेश भोर यांनी प्रास्ताविक केले. तर, सूत्रसंचालन किरण भोर यांनी केले. तसेच विवाहाची व्यवस्था विकास भोर आणि शिवसम्राट युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी पाहिली.





