Pimpri : नागरिकांनी पाणी उकळून प्यावे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गिलीयन बॅरी सिंड्रोमचा (जीबीएस) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. हा आजार पिण्याच्या पाण्यातून पसरत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून थांड करुन व गाळून प्यावे. त्याचबरोबर सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवाव्यात, असे आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वच वयोगटातील व्यक्तींना या विषाणूची बाधा होत आहे. आठ रुग्णालयाच्या झोन अंतर्गत १६ वैद्यकीय पथकांमार्फत शहरात घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. आजअखेर हजारो घरांची तपासणी करण्यात येत आहेत. त्यामध्ये जीबीएसचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी त्याचबरोबर जीबीएसचा प्रादुर्भव रोखण्यासाठी महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पिण्याच्या पाण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना पाणी पुरवठा विभागाने केली आहे.
सर्व गृहनिर्माण संस्थानी आपल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या नियमीतपणे (वर्षातून दोनदा) स्वच्छ कराव्यात. बोअरवेल व विहिरीचे पाण्याचे नमुने तपासणी करून मगच ते पाणी वापरावे. टॅंकर पुरवठा धारकाकडून टॅंकर भरण्याचे ठिकाणाबाबत सोसायटीला माहिती असणे आवश्यक आहे. तेथील पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी.
त्यानंतर पाण्याचा वापर करावा. पाण्याच्या टाकीत पिण्याचे पाणी व टॅंकरचे पाणी एकत्रित करू नये. ५.२० लिटर जारमधील पाण्याच्या गुणवत्तेची खात्री करूनच वापर करावा. सद्यस्थितीत पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता ओंभासे यांनी केले आहे.





