Pimpri: खोपोली शहर विकास आराखड्यावर नागरिकांचा आक्षेप

खालापूर : खोपोली शहराचा नवीन विकास आराखडा हा ड्रोनच्या सहाय्याने किंवा केवळ टेबलावर बसून तयार केलेला विकास आराखडा असून त्याने शहराचे कोणतेही भले होणार नाही. या विकास आराखड्यात अनेक त्रुटी असून तो प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून तयार केला जावा, अशी भावना खोपोली शहरातील नागरिकांच्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
खोपोली-खालापूर संघर्ष समितीने नवीन विकास आराखड्यासंदर्भात माहिती देण्यासाठी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन ठेवले होते. खोपोली बाजारपेठेतील रस्ता हा १२ मीटरचा असून तो काहीही कारण नसताना १८ मीटरचा दाखविण्यात आल्याने व्यापारी वर्गामध्ये तीव्र असंतोष आहे.
मीळ येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये अजून वीस वर्षांचा कचरा साठविण्याची क्षमता असताना व त्यावर नगरपालिकेने १२ ते १५ कोटी रुपये खर्च केलेले असतानाही तो प्रकल्प तिकडून लौजी येथील २० एकर जागेत हलविण्याचा घाट घातल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. यासह इतरही अनेक बाबी असून हा विकास आराखडा केवळ टेबलवर बसून बनविण्यात आल्याचे अनेक किस्से उपस्थितांनी बैठकीत ऐकवले.
नवीन विकास आराखड्यामध्ये शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीसाठ्यामध्ये वाढ करणे, हॉस्पिटलसाठी जागा राखीव ठेवणे यासाठी कोणतीही तरतूद नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली गेली. तसेच ज्यांना विकास आराखड्यामध्ये हरकत घ्यायची आहे, त्यांनी तातडीने नगर परिषदेमध्ये जाऊन हरकत घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.





