Pimpri Chinchwad Traffic: अण्णाभाऊ साठे जयंतीमुळे वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
Pimpri Chinchwad Traffic: लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निगडीतील भक्ती-शक्ती चौकात गर्दीची शक्यता; पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून तात्पुरते निर्बंध लागू.

Pimpri Chinchwad Traffic – साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने सायंकाळी तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पुणागेट हॉटेलसमोरील ‘मर्ज आऊट’ येथून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
या मार्गावरील वाहनांसाठी सेंट्रल चौक–भक्ती-शक्ती उड्डाणपूल–रुद्रा पार्किंग हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असून, वाहनचालकांनी त्याचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांतील रुग्णवाहिका, अग्निशामक दल व अन्य आपत्कालीन वाहनांना मात्र या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
जयंती सोहळ्यादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी निगडी वाहतूक विभागाकडून संबंधित ठिकाणी बॅरिकेडिंग, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक नियोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.





