Pimpri Chinchwad Rain: पिंपरी-चिंचवडची दाणादाण! महापालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे; घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल
Pimpri Chinchwad Rain: पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांना भीषण पूर; आंबेडकर कॉलनी, भाटनगर, फुगेवाडीतील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर.

Pimpri Chinchwad Rain – पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. ५) रात्रभर आणि सोमवारी (दि. ६) सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने पिंपरी चिंचवड शहराची दाणादाण उडाली. पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले, तर सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या नालेसफाईचे पितळ यात उघडे पडले. नाल्यांची सफाई झाली नसल्याने नागरिकांच्या घरा-दारात, दुकानात पाणी शिरून अनेकांचे नुकसान झाले.
रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला. पात्राबाहेर पाणी वाहत असल्याने नदीलगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. पिंपरीतील आंबेडकर कॉलनी, भाटनगर, रिव्हर रोड, कासारवाडी आणि फुगेवाडी परिसरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ उडाली. तर चिचंवडमध्ये देखील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.
त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. चिंचवडमधील तानाजीनगर, केशवनगर आणि लक्ष्मीनगर परिसरातील काही इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहचले होते. पार्किंगमध्ये सर्व वाहने पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. विजेचे मीटर पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. या परिसरातील दीड हजारांपेक्षा जास्त रहिवासी घरांमध्ये अडकले होते. पुराच्या पाण्याचा फटका धार्मिक स्थळांनाही बसला.
चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर आणि रहाटणी गावातील राम मंदिर परिसरात पाणी शिरले. थेरगाव येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला, तर चिंचवडमधील आदित्य बिर्ला पूलही जलमय झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई केली जाते. यंदा देखील आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील तब्बल १४२ किमी नाल्यांची सफाई केली असल्याचा दावा करण्यात आला. हा दावा दोन दिवस पडलेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला.
यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फसवाफसवी देखील समोर आली. शहरातील नाल्यांची योग्य सफाई झाली नसल्याने चिखलीतील घरकुल परिसर, कासारवाडी, थेरगाव, लालटोपीनगर, भोसरीतील काही भागातील घरांमध्ये पाणी शिरले. नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडवल्याने अनेक ठिकाणी पाणी जाण्यास वाट मिळत नाही. परिणामी, पाणी नागरिकांच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वाहतुकीवर परिणाम
शहरातील टेल्को रस्ता, स्पाइन रस्ता आणि देहू-आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. निगडी, रावेत, चिंचवड, ताथवडे, वाकड परिसरातही अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कार्यालये आणि औद्योगिक कंपन्यांकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. अनेक जण वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत.
नदी पात्रालगतचा परिसर पाण्याखाली
पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने या नद्यांच्या पात्रालगतचे परिसर पाण्याखाली गेले आहेत. आंबेडकर कॉलनी, भाटनगर आणि रिव्हर रोड, फुगेवाडी, कासारवाडी, मोरया गोसावी मंदिर तसेच केशवनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. महापालिकेच्या विशेष आपत्कालीन पथकाने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले.






