Pimpri Chinchwad Police: अखेर पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयाचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून अधिकृत ‘जीआर’ जारी
Pimpri Chinchwad Police: मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांच्या बैठकीनंतर अवघ्या काही दिवसांतच शासन निर्णय जारी; आमदार महेश लांडगे आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या पाठपुराव्याला यश.

Pimpri Chinchwad Police – अखेर पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील वळुमाता प्रक्षेत्रातील २० हेक्टर शासकीय जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र व अत्याधुनिक मुख्यालयासाठी, परेड ग्राऊंड आणि इतर अनुषंगिक सुविधांसाठी भोगवटामूल्यरहित व महसूलमुक्त स्वरूपात हस्तांतरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय १ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला.
शासन निर्णयानुसार या जमिनीवर पोलीस आयुक्तालयाचे आधुनिक मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि आवश्यक प्रशासकीय व पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. संबंधित जमिनीचा वापर केवळ मंजूर उद्देशासाठीच करता येणार असून, तीन वर्षांच्या आत प्रकल्पाचे काम सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विषय सविस्तर मांडण्यात आला होता.
या बैठकीला आमदार महेश लांडगे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते. या बैठकीची फलश्रुती झाली आहे. बैठकीत शासन निर्णय तातडीने काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार अल्पावधीतच शासनाने मंजुरी जाहीर केली. आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला स्वतंत्र, प्रशस्त आणि अत्याधुनिक मुख्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामुळे पोलीस प्रशासनाचे कामकाज अधिक सक्षम होण्यास, प्रशिक्षण व नियोजनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होणार आहे. वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि गतिमान पोलीस यंत्रणेचा लाभ मिळणार आहे.




