Pimpri Chinchwad : सामान्य प्रशासनाचा कारभार उपायुक्तांकडे
Pimpri Chinchwad : महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजात नस्ती अनेक स्तरांतून फिरत असल्याने निर्णयांना विलंब होण्याच्या तक्रारी

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील कामकाजाला गती देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातील नस्ती सादरीकरणाचे अनावश्यक स्तर कमी करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. या विभागाचे विभागप्रमुख म्हणून उपायुक्तांना घोषित करण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागातील नियमित प्रशासकीय नस्त्यांसाठी सहायक आयुक्तांकडे सादरीकरण करण्याचा टप्पा वगळण्यात आला आहे. यापुढे नस्ती उपायुक्तांमार्फत थेट अतिरिक्त आयुक्तांकडे सादर कराव्यात, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नस्ती सादरीकरणाची सुधारित कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार लिपिक, मुख्य लिपिक, प्रशासन अधिकारी, उपायुक्त (विभागप्रमुख) आणि अतिरिक्त आयुक्त असा क्रम राहणार आहे.
या निर्णयामुळे फाइल मंजुरीतील एका प्रशासकीय पायरीची बचत होऊन निर्णयप्रक्रियेला वेग मिळेल, अशी अपेक्षा आहे. महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजात नस्ती अनेक स्तरांतून फिरत असल्याने निर्णयांना विलंब होण्याच्या तक्रारी होत होत्या. त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागासाठी हा सुधारित निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित विभागांनी आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.





