Pimpri Chinchwad News: वॉशिंग सेंटरवर पाण्याची नासाडी! शहरात पाण्याची बचत कागदावर; अनधिकृत सेंटरवर महापालिका मेहरबान
Pimpri Chinchwad News: नागरिकांना पाण्यासाठी वणवण अन् वॉशिंग सेंटरवर पिण्याच्या पाण्याची नासाडी; अनधिकृत सेंटरवर कारवाई कधी होणार?

Pimpri Chinchwad News- पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांना सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे आणि दुसरीकडे शहरात वाहन धुण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. शहरातील विविध भागांमध्ये वॉशिंग सेंटर मोठ्या संख्येने सुरू असून, त्यातील अनेक सेंटरच्या अधिकृततेबाबतच प्रश्नचिन्ह आहे. पाण्याची उपलब्धता मर्यादित असताना अशा सेंटरमधून होणारी पाण्याची नासाडी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. तर दुसरीकडे व्यावसायिक वापरातून होणारी पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा नेमकी काय करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यापूर्वीच पाण्याचे नियोजन करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीसाठा आणि भूजलपातळीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
तीच परिस्थिती शहरात असून पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुणे, सर्व्हिसिंग आणि इतर व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणात होत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवणे महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, शहरातील अनेक वॉशिंग सेंटरवर पाण्याचा वापर सुरू असतानाही त्यांच्यावर नियमित तपासणी किंवा कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
शहरातील वाहनांच्या अधिकृत शोरूम किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुण्याची सुविधा असलेली काही केंद्रे नियमांनुसार कार्यरत असतात. मात्र, त्यांची संख्या मर्यादित आहे. त्याउलट शहरातील विविध रस्ते, सोसायट्यांच्या परिसर आणि व्यावसायिक भागांमध्ये स्वतंत्र वॉशिंग सेंटर मोठ्या संख्येने सुरू असल्याचे दिसते. या सेंटरना पाणी कोठून मिळते? त्यांच्याकडे व्यावसायिक पाणी वापरण्याची परवानगी आहे का? पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था आहे का? सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते? या प्रश्नांची उत्तरे महापालिकेच्या संबंधित विभागाकडे आहेत का, हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.
नियम कोणासाठी?
पाण्याची बचत करण्यासाठी महापालिका नागरिकांना विविध सूचना करते. घरगुती वापरात पाण्याची नासाडी करू नका, वाहन धुण्यासाठी पाईपऐवजी बादलीचा वापर करा, पाणी जपून वापरा, अशा सूचना दिल्या जातात. मात्र, त्याचवेळी व्यावसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करणाऱ्या केंद्रांवर कारवाई होत नसेल, तर “नियम फक्त नागरिकांसाठीच आहेत का?” असा सवाल उपस्थित होतो.
वाहन धुण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर होत असल्यास त्यावर निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. त्याऐवजी प्रक्रिया केलेले सांडपाणी किंवा अन्य पर्यायी स्रोतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देता येऊ शकते. मात्र, त्यासाठी महापालिकेने आधी शहरातील वॉशिंग सेंटरची अधिकृत नोंदणी, त्यांचा पाणीवापर आणि त्यांच्यावर लागू असलेल्या नियमांची तपासणी करणे आवश्यक आहे.
“शहरातील वॉशिंग सेंटरवर त्यांच्या खासगी बोअरवेल्स किंवा विहीरीमधून पाणी वापरले जाते. पिण्याचे पाणी ते वापरत नाही. याबाबत तपासणी करण्यात येईल.”
– अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता. पाणीपुरवठा.






