Pimpri Chinchwad News: शहरातील १९६ किमी रस्त्यांवर खड्ड्यांचा ब्रेक! खड्डे बुजवण्यासाठी १५० कोटीची तरतूद; खड्डे शोधण्यासाठी लाखोंचा खर्च
Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहरातील १९६ किमी अंतराच्या ४३२ रस्त्यांची दयनीय अवस्था; खड्डे शोधणाऱ्या खासगी एजन्सीचा अहवाल धूळ खात पडून राहिल्याने लाखो रुपये पाण्यात.

Pimpri Chinchwad News – शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने एका खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या ढिसाळ आणि संथ कारभारामुळे हा संपूर्ण प्रकल्पच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तसेच, खड्डे दुरुस्तीवर महापालिकेकडून दुप्पटीहून अधिकचा खर्च होत आहे.
शहरातील वेगवेगळ्या भागांतील एकूण ४३२ रस्त्यांवर खड्डे आढळून आले असून तब्बल १९६ किलोमीटर अंतराचे रस्ते खराब असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात नेमके कुठे आणि किती खड्डे आहेत, हे शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या एका खासगी संस्थेला कंत्राट दिले होते. या एजन्सीने शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची पाहणी केली.
रस्ता खराब होण्याची कारणे आणि त्यावर तातडीने करावयाच्या उपाययोजना याबद्दलचा सविस्तर अहवाल स्थापत्य विभागाकडे सुपूर्द केला. परंतु, या अहवालावर वेळेत आणि सुचवलेल्या तांत्रिक पर्यायानुसार कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, खड्डे शोधण्यासाठी संस्थेवर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च पूर्णपणे वाया गेला असल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, नियोजनाअभावी आता महापालिकेला खड्डे दुरुस्तीवर मूळ बजेटपेक्षा दुप्पटीहून अधिक खर्च करावा लागत आहे. संस्थेनेला अहवाल मिळताच स्थापत्य विभागाने तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आणि लालफितीच्या कारभारामुळे या अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. योग्य वेळी डांबर आणि खडीचा वापर करून जे खड्डे किरकोळ खर्चात बुजवणे शक्य होते, ते आता वेळेवर न बुजवल्यामुळे अधिक मोठे आणि धोकादायक झाले आहेत.
४३२ रस्त्यांवर खड्डेच खड्डे
या सर्वेक्षणातून पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था चव्हाट्यावर आली आहे. अहवालानुसार, शहरातील वेगवेगळ्या भागांतील तब्बल ४३२ रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे आढळून आले आहेत. यामध्ये अंतर्गत रस्त्यांपासून ते मुख्य महामार्गांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. एकूण आकडेवारीचा विचार केला तर तब्बल १९५.१०७ किलोमीटर अंतराचे रस्ते पूर्णपणे खराब झाले असून ते वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनले आहेत.
आतापर्यंत १ हजार ६०९ खड्डे बुजवल्याचा दावा
शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे आतापर्यंत २ हजार १६४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १ हजार ६०९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. खड्ड्यांपैकी ५५६ खड्डे कोल्ड मिक्स, २३ बीबीएम, ७५४ जीएसबी, १२९ पेव्हिंग ब्लॉक आणि १५६ खड्डे काँक्रीटच्या माध्यमातून बुजविण्यात आले आहेत. उर्वरित ५५५ खड्ड्यांची दुरुस्तीकाम सुरू आहे, असे स्थापत्य विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. असे असले तरी, शहरात खड्डे कायम असल्याचे चित्र आहे.
“सर्वेक्षण अहवालानुसार स्थापत्य विभागाकडून रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जात आहे. त्यानुसार, संबंधित रस्त्यांच्या निविदा काढल्या जातात. त्यानुसार काम करून घेतले जाते. मात्र, जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यावर महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.”
– अजय सुर्यवंशी, सहशहर अभियंता






