Pimpri Chinchwad News – घनदाट लोकवस्तीच्या मध्यभागी ज्वलनशील इंधनाचा साठा आणि त्याच ठिकाणी अग्निरोधक यंत्रणांचा अभाव… ही स्थिती म्हणजे अक्षरशः ‘जिवंत बॉम्ब’ ठरू शकते. शहराच्या हद्दीत ८४.६२ म्हणजेच एकूण १०४ पेट्रोल पंप कार्यरत असताना केवळ ७ पंपांकडेच अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) असल्याची बाब समोर आली आहे. उर्वरित पंपांपैकी ९ जणांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित असून बहुतांश पंपांकडे सक्षम अग्निरोधक व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. पेट्रोल व डिझेलचे वाफे अत्यंत ज्वलनशील असतात. शॉर्टसर्किट, स्थिर वीज, मोबाइल वापर, टँकरमधून इंधन भरण्यावेळी झालेली चूक, या कोणत्याही कारणाने ठिणगी पडल्यास आग वेगाने भडकू शकते. अशा ठिकाणी कार्यरत अग्निशामक सिलिंडर, हायड्रंट, इमर्जन्सी शट-ऑफ स्विच, अलार्म प्रणाली, सीसीटीव्ही देखरेख आणि प्रशिक्षित कर्मचारी ही किमान गरज आहे. मात्र काही पंपांवर कालबाह्य सिलिंडर, अपुरी वाळूची बादली, न चालणारे अलार्म आणि अपुरे प्रशिक्षण असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे शहरातील अनेक पेट्रोल पंप शाळा, रुग्णालये, बाजारपेठा आणि उंच इमारतींच्या सान्निध्यात आहेत. वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन सेवांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. एखादी दुर्घटना घडल्यास आग आणि धूर काही मिनिटांतच परिसर व्यापू शकतो, ज्यामुळे जीवितहानी टाळणे कठीण ठरू शकते. सुरक्षा ऑडिट नगररचना नियम व अग्निशमन विभागाच्या मानकांनुसार सुरक्षा ऑडिट, नियमित फायर ड्रिल आणि उपकरणांची तपासणी अनिवार्य असतानाही ना हरकत दाखल्याविना पंप सुरू राहणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांकडून सर्व पंपांचे तातडीने सर्वसमावेशक सुरक्षा ऑडिट करण्याची आणि त्रुटी दूर न करणाऱ्या पंपांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. अग्निरोधक यंत्रणा ही औपचारिकता नसून हजारो कुटुंबांच्या सुरक्षिततेची हमी आहे. योग्य उपाययोजना न केल्यास मध्यवस्तीतील हे पेट्रोल पंप कधीही मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतात, आणि त्याची किंमत संपूर्ण शहराला मोजावी लागू शकते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एकूण १०४ पेट्रोप पंप असून त्यापैकी केवळ सात पेट्रोल पंप चालकांकडे सक्षम अग्निरोधक यंत्रणा आहे. उर्वरित सात जणांनी अग्निशामक विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांच्या यंत्रणेत काही त्रुटी आढळल्या असून त्या दुरूस्त करण्यासाठी सांगितले आहे. उर्वरित पेट्रोल पंप चालकांना येत्या १५ दिवसांमध्ये नोटीस देण्यात येणार आहे. ठराविक कालावधीत त्यांनी सक्षम अग्निरोधक यंत्रणा बसविली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. – व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका याकडे हवे लक्ष – अग्निशामक सिलिंडर कार्यरत स्थितीत असावे. – फायर हायड्रंट व मुबलक पाणीसाठा असावा – जवळच वाळूचे ड्रम उपलब्ध ठेवणे. – आपत्कालीन निर्गमन मार्ग स्पष्ट दिसणारा असावा. – विद्युत प्रणाली सुरक्षित व त्यास अर्थिंग असावी. – ज्वलनशील पदार्थ वेगळ्या साठवणीत असावेत. – धूम्रपान निषिद्ध फलक पेट्रोल पंपावर लावणे – अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी नियुक्त करावेत.