Pimpri-Chinchwad : तिकीट आरक्षणासाठी आगारात गर्दी..! सर्व्हर डाऊनमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड, वेळेचाही अपव्यय….

पिंपरी (प्रतिनिधी) – परीक्षा संपल्याने व सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने अनेकांना आपापल्या गावी जाण्याचे वेध लागले असून प्रत्येकजण आपला प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी तिकीटांचे आगाऊ बुकींट करत आहेत. आॅनलाइन सुविधेमुळे आरक्षणासाठी आगारात जाण्याची गरजच नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाइन तिकीट आरक्षण करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. परिणामी आरक्षणासाठी प्रवाशांना आगारात जावे लागत असून त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच वेळेचा अपव्यय होत आहे.
येत्या २ मे पासून उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. तसेच उन्हाळा सुरू झाला की, एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यात उन्हाळी सुट्यांसाठी गावाला जाणाऱ्याची तसेच धार्मिक स्थळांना भेटी देणाऱयांची संख्या वाढते. त्यामुळे या काळात एसटी फुल्ल असतात. आपला प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी आगाऊ बुकिंग केले जाते. तसेच सध्या एसटीला विविध प्रकारची प्रवासी तिकीटात सूट असल्याने प्रवासी एसटीला प्राधान्य देत आहेत. मात्र, ऐन गर्दीच्या हंगामात एसटीच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे तिकीट आरक्षण करण्यासाठी एसटी आगारात जावे लागत आहे. त्यामुळे अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
बुकींगसाठी https://msrtc.maharashtra.go in या संकेतस्थळाचा किंवा एसटी हामंडळाच्या अॅपचा वापर होतो. मागील काही दिवसांपासून एसटी हामंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन तिकीट आरक्षण करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संकेतस्थळावर लॉगिन करण्यापासून ते तिकिटाचे ऑनलाइन पैसे भरण्यापर्यंत अनेक अडचणी येत आहेत. काही वेळेस तिकिटाचे पैसे खात्यातून वजा होऊनही आरक्षण होत नाही. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच आगारात त्यासंदर्भात विचारणा केल्यास आगारात जाऊन तिकीट काढण्यास सांगण्यात येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
बुकिंगसाठी गर्दी
आॅनलाइन बुकिंग होत नसल्याने तसेच गावचे वेध लागल्याने पिंपरी चिंचवड शहरातील चाकरमाणी शहरातील एकमेव असलेल्या वल्लभनगर आगारात गर्दी करत आहेत. प्रत्यक्ष जाऊन बुकिंग करणाऱयांची संख्या त्यामुळे वाढत आहे. तर, भर उन्हात सुविधेचा वापर करता येत नसल्याने प्रवाशांनी नापसंती व्यक्त केली.





