Pimpri-Chinchwad : लक्ष्मीपूजनच्या दिवशीच २७ आगीच्या घटना; अग्निशामक दलाची शर्थीची धावपळ

Pimpri-Chinchwad : दिवाळीच्या आनंदात शहर झगमगत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्यांच्या उड्यांसह आगीच्या घटनांची मालिका सुरूच राहिली. मागील तीन दिवसांत तब्बल ५६ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून, केवळ लक्ष्मीपूजनच्या दिवशीच २७ आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत अग्निशामक दलाच्या जवानांची प्रचंड धावपळ सुरूच होती.
शहरात सज्जतेचा भाग म्हणून अग्निशामक विभागाने आधीच १९ अग्निशमन वाहने संवेदनशील भागांमध्ये तैनात केली होती. तसेच सर्व उपकेंद्रांमध्येही तत्परतेने दल कार्यरत ठेवले होते. त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले व मोठ्या प्रमाणात वित्तहानी टळली. नागरिकांकडून अग्निशामक दलाच्या या तात्काळ प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
आगीचा पहिला कॉल सायंकाळी साडेसहा वाजता चिखली पोलीस ठाण्यातून आला. मोई चौक येथील ‘वाय ग्रुप’ परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. मात्र त्यानंतर एका मागोमाग एक कॉल येत राहिले.
रात्री आठ ते साडेबारा या दरम्यान तब्बल २० कॉल्स प्राप्त झाले. यात काही ठिकाणी उंच इमारतींमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे, एम्पायर स्क्वेअर या इमारतीच्या १७व्या मजल्यावर व वाकड येथील एका सोसायटीच्या ८व्या मजल्यावर लागलेल्या आगींवर दलाने शर्थीचे प्रयत्न करत नियंत्रण मिळवले. शेवटचा कॉल पहाटे साडेचार वाजता गजानन नगर, रहाटणी फाटा येथे नखाते कमानीजवळ लागलेल्या आगीसाठी आला.
दरम्यान, महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ मंगळवारी रात्री झाड कोसळल्याची घटना घडली. अग्निशामक दलाने तात्काळ धाव घेत झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
अग्निशामक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, फटाके फोडताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि कोणत्याही प्रकारची बेफिकिरी टाळावी, अन्यथा आनंदाचा सण दुर्घटनेत बदलू शकतो.





