Pimpri : उन्हाळी शिबिराकडे मुलांची पाठ

भोसरी : एकेकाळी उन्हाळ्याच्या सुट्टया म्हणजे मुलांसाठी मजा, मस्तीचा काळ होता. शहरातील लहानमोठी मैदाने आणि गल्लीतील मैदाने मुलांनी भरलेली असायची. कुणी लपंडाव तर कोणी कबड्डी, क्रिकेट असे मैदानी खेळ खेळायचे. तर कुणी तबलावादनात, कोणी चित्र काढण्यात रममाण व्हायचे, पण सध्याचे चित्र बऱ्याच अंशी बदलले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुले मैदानी खेळाऐवजी मोबाइलमधील गेमला जास्त महत्व देत असल्याचे दिसून आले आहे.
मराठी माध्यम शाळेच्या परिक्षा संपल्यावर शाळेला सुट्टया लागायला सद्या अवकाश आहे. मात्र इंग्रजी शाळांना सुट्टया लागल्या आहेत. उन्हाळी सुट्टया लागण्यापूर्वीच वेळ कसा घालवायचा, याचे नियोजन मुले करतात. काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये विविध छंदवर्ग भरवले जायचे. चित्रकला, अभिनय, तबला, योगा, शास्त्रीय गायन, नृत्य, हस्तकला, क्रिकेट प्रशिक्षण, कथाकथन यासारख्या विविध क्षेत्रांत विद्यार्थी सहभागी होत असत. मात्र, आता उन्हाळी शिबिरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सद्यस्थितीत केवळ नाममात्र छंदवर्ग उरले असून त्यामध्ये मोजकेच विद्यार्थी नाव नोंदवतात. नृत्यकला छंदवर्ग आता एक बॅच भरवणेही कठीण होते. मोबाइल, इंटरनेट, रिल्स, गेम्स आणि सोशल मीडियाने मुलांचे लक्ष पूर्ण वेधून घेतले आहे.
छंदवर्ग व्यक्तिमत्त्व घडविण्याचा आरसा
छंदवर्गाच्या घटत्या प्रमाणाला थांबवण्यासाठी काही ठोस उपाय गरजेचे आहेत. शाळा आणि पालक यांच्यात संवाद वाढवणे. छंदवर्गाचे महत्त्व शाळांमध्ये “वैकल्पिक विषय म्हणून समाविष्ट करणे. पालकांसाठी जागरूकता कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. अर्थात, सर्वच चित्र नकारात्मक नाही. काही पालक अजूनही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी छंदवर्गाला प्राधान्य देतात. काही मुलही मोबाइलशिवाय शिकण्याचे समाधान शोधतात. परंतु या सकारात्मक उदाहरणांची संख्या वाढवण्यासाठी सर्व संबंधित घटकांना एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. छंद केवळ वेळ घालवण्याचं साधन नाही, तर तो व्यक्तिमत्त्व घडविण्याचा आरसाही आहे. म्हणूनच मोबाइलच्या स्क्रीनपलिकडील जगात डोकावणे ही आजची गरज आहे.
छंदवर्ग म्हणजे टाइमपास नाही
छंदवर्गातील घटते प्रमाण केवळ मुलांच्या इच्छांमुळेच नाही, तर पालकांचाही दृष्टिकोन बदलला आहे. आज बहुतांश पालक आपल्या मुलांसाठी शिक्षणाच्या बाहेरचा वेळ “फ्री टाइम” समजतात. जो मोबाइलसह त्यांना मिळतो. छंदवर्ग म्हणजे केवळ ‘टाइमपास’ असे समजण्याची चूक अनेक पालक करत आहेत. मुलांना शिक्षणाबरोबरच जीवन कौशल्य शिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
सुरुवातीला मुले थोडी संकोचलेली असतात, पण काही दिवसांतच त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास दिसू लागतो. अभिनय शिकताना संवादकौशल्य, शरीर भाषा, भावनात्मक अभिव्यक्ती यासारख्या अनेक गोष्टी नकळत विकसित होतात. ही केवळ अभिनयाची शिकवण नसते, तर व्यक्तिमत्त्व घडवण्याची एक प्रक्रिया असते. मोबाइलच्या दुनियेत अडकलेल्या मुलांना खऱ्या अर्थाने जोडून ठेवायचे असेल, तर छंदवर्गांसारखे पर्याय अत्यावश्यक आहेत.
– गौरी गायकवाडआजच्या काळात शिक्षणाबरोबरच जीवनकौशल्य शिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. छंदवर्गातून मुले स्वतःच्या भावना व्यक्त करू शकतात. मोबाइलवर वेळ घालवण्यापेक्षा छंदवर्ग त्यांच्या आयुष्याला एक दिशा देतो.
– मनिषा वाळुंज, पालकमी आधी चित्रकलेच्या वर्गाला जात होतो. पण आता युट्यूबवर बरेच शिकता येते. वेळही वाचतो. एकाच विषयावर विविध दृष्टीकोनातून बारीकसारीक गोष्टी आणि कौशल्यही मोबाइलवरून आत्मसात करणे शक्य होते.
– अंकुश म्हात्रे, विद्यार्थी





