Pimpri : ….अन् उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने लावला फोन

पिंपरी – उपमुख्यमंत्री अजित पवार जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने शहराच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी भेट दिली. तिथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहर उपाध्यक्ष आतिश बारणे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन मोशी परिसरातील समस्यांवर चर्चा केली आणि याबाबत निवेदन दिले.
निवेदन वाचताच उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहर उपाध्यक्ष आतिश बारणे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या मोशी प्रभागातील काही समस्या आजही येथील नागरिकांना भेडसावत आहेत.
मोशी चिखली येथील रस्त्यांची खूप दूरवस्था झालेली आहे. तसेच रिव्हर साइड रेसिडेन्सी येथून नाशिक रोडला जोडणारा जोड रस्ता अपुऱ्या अवस्थेत आहे. शिव रोड येथील रस्ता देखील अपुऱ्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
त्याचबरोबर भारत माता चौक ले लक्ष्मी चौक यादरम्यान वाहतूक कोंडीच्या समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. येथे अनेकदा अपघात होऊन जीवित हानी ही झाली आहे. महापालिका प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
निवेदनातील शेवटची ओळ वाचताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यास फोन करुन या समस्या सोडविण्यासाठी सांगितले. सुमारे तीन हजार नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आल्यानंतरही अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्याच्या मागणीसाठी दाखविलेल्या तत्परतेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
यामुळे मोशीतील नागरिकांकडून त्यांच्या समस्या मांडल्याबद्दल उपाध्यक्ष आतिश बारणे यांचे आभार मानले तसेच पहाटेपासून कार्यरत असतानाही न थकता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.





