Pimpri : पालिका आयुक्तांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्तांकडे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह परदेशी गेले असल्याने बुधवार (दि. ३०) ते बुधवार (दि. ७ मे) या आठ दिवसांच्या रजा कालावधीत त्यांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे असणार आहे. त्याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी आदेश काढले आहेत.
महापालिका आयुक्त शेखर सिंह फ्रान्स देशातील पॅरिस शहरामध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. त्याबाबत त्यांनी नगरविकास विभागाकडे रजेसाठी अर्ज केला होता. त्यानुसार आयुक्त सिंह हे ३० एप्रिल ते ७ मे या कालावधीत पर्यटनासाठी सुट्टीवर आहेत.
त्यांच्या रजा कालावधीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे महापालिकेचा कार्यभार सांभाळणार आहे. दरम्यान, नदीसुधार प्रकल्प, धार्मिक स्थळांना दिलेल्या नोटीसींमुळे आंदोलने सुरू आहेत. तसेच शहरातील नागरिकांच्या पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. असे असताना महापालिका आयुक्त पर्यटनासाठी परदेशात गेल्याने महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे.





