Pimpri : वृक्षारोपणाची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी : ‘ड’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या विकास आराखड्यातील विकसित केलेल्या रस्त्यावरील करावयाचे वृक्षारोपण आणि दुभाजकामधील वृक्षारोपण याचे देखभाल दुरुस्ती कामांची अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पाहणी केली. रस्त्यालगतच्या पादचारी मार्गावर अतिक्रमण होऊ देऊ नका, रस्ता दुभाजक सुस्थितीत ठेवा, दुभाजकांमधील झाडांची देखभाल करा, अशा सूचनाही जांभळे पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या वाकड येथील उत्कर्ष चौक, पिंक सीटी, कावेरीनगर पोलीस लाईन तसेच ‘ब’ क्षेत्रीय कार्यलयांतर्गत येणार्या गुजरनगर, चिंचवडे चौक, बिर्ला हॉस्पिटल, आकुर्डी येथील रस्ता दुभाजक व पादचारी मार्ग कामाची पाहणी केली. याप्रसंगी उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उद्यान अधिक्षक राजेंद्र वसावे, उद्यान विभागाचे पर्यवेक्षक यांच्यासह उद्यान व स्थापत्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड, वाल्हेकर वाडी, आकुर्डी, थेरगाव अशा भागातील विविध रस्त्यांची पाहणी करताना जांभळे पाटील यांनी नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी उपस्थित अधिकार्यांना विविध सूचना दिल्या. यामध्ये रस्ता दुभाजकांची वेळोवेळी स्वच्छता करणे, रस्ता दुभाजकांमध्ये झाडांची लागवड करणे, रस्ता दुभाजकांमध्ये असलेल्या झाडांना वेळेवर पाणी देणे, पादचारी मार्गावर शक्य तेथे सावली देणार्या झाडांची लागवड करणे, अशा सूचनांचा समावेश होता. ..





