प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पायी चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात ७ सप्टेंबर रोजी दुपारी जे बी एम कंपनीजवळ महाळुंगे येथे घडला.अनिस वाजीदअली अहमद असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. समीर अनिस अहमद (वय २२, रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) यांनी गुरुवारी (दि. ११) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील अनिस अहमद हे महाळुंगे गावाकडून एचपी चौकाकडे पायी जात होते. त्यावेळी एचपी चौकाकडून महाळुंगेकडे येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत अनिस यांना समोरून धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.