Pimpri Accident : मावळमध्ये भीषण अपघात ; ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवल्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाच्या अंगावर पडला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (८ ऑक्टोबर) सायंकाळी मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक येथे घडली.बाळू सोपान चांदेकर (वय ४७, रा. आढले खुर्द, ता. मावळ, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. या प्रकरणी खंडू बारकू घोटकुले (वय ४६, रा. आढले बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) यांनी गुरुवारी (दि. ९) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या शेतात ज्वारी पेरणीचे काम सुरु होते. ट्रॅक्टर बाळू चांदेकर हे चालवत होते. ट्रॅक्टरच्या साहाय्याने काम केल्यानंतर ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. त्यामध्ये अडकून बाळू चांदेकर यांचा मृत्यू झाला. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





