Pimpri Accident | टेम्पोने घेतले दोन निरपराध जीव ; १७ वर्षांची मुलगी आणि ३२ वर्षांची महिला ठार

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका १७ वर्षीय तरुणी आणि एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ६) रात्री भोसरी येथे गृहलक्ष्मी कॉलनीकडून सदगुरुनगर कमानकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.कादंबरी काशिनाथ गादेकर (वय १७) आणि प्रतिभा कृष्णा आंबटवार (वय ३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी काशिनाथ पाडूरंग गादेकर (वय ४१, रा. भोसरी) यांनी रविवारी (दि. ७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार हनुमंत सोपान वाडेकर (वय ३६, रा. शिरोली, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत वाडेकर त्याच्या ताब्यात असलेला साऊंड सिस्टीम टेम्पो (एमएच १४ एएस ५८२३) वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवत होता. त्याने फिर्यादीची मुलगी कादंबरी आणि मेव्हण्याची पत्नी प्रतिभा आंबटवार यांना जोरात धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळी न थांबता पळून जात असताना लोकांनी त्याला पकडले. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




