Bhosari Accident : इंद्रायणी नगरमध्ये भीषण अपघात! टेम्पोच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Bhosari Accident : सकाळी कामावर जाताना टीप टॉप चौकासमोर घडली घटना; अज्ञात टेम्पो चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Bhosari Accident – अज्ञात टेम्पोने दुचाकीला हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास इंद्रायणी नगर, भोसरी येथील हॉटेल टीप टॉप चौकासमोर घडली. विशाल अनिल कोटावले (वय १९) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी यश अनिल कोटावले (वय २१, रा. सदगुरु नगर, भोसरी) यांनी रविवारी (दि. २२) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार टेम्पो वरील अज्ञात चालक आणि नो पार्किंगमध्ये उभा असलेला ट्रक (एमएच १४ जीसी २४६०) यावरील अज्ञात चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ विशाल अनिल कोटावले हा रविवारी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून कामावर जात होता.
तो इंद्रायणी नगर, भोसरी येथील हॉटेल टीप टॉप चौकासमोर आला असता त्यावेळी एका पांढऱ्या टेम्पोने उजव्या बाजूला वळण घेताना विशालच्या दुचाकीला घासले. ही धडक वाचवण्याच्या प्रयत्नात विशालची दुचाकी रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील बाजूस जोरात धडकली. या अपघातात विशाल गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.





