Pimpri Accident : मिक्सर ट्रक ठरला ‘यमराज’! भरधाव वेगात तरुणाला चिरडले; जागीच मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – भरधाव वेगातील मिक्सर ट्रकने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ८) दुपारी दोनच्या सुमारास महिंद्रा कंपनी गेट नं. ८ आणि ९ दरम्यान, खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.ज्ञानेश्वर धनपाल खांडेकर (वय ३४) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. राकेश विजय शंकर (वय ५६, रा. रामनगर, उन्नाव, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीच मिक्सर ट्रक चालकाचे नाव आहे.
महेश गंगाधर राउत (वय २१, रा. सुभाष नगर, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. ९) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश शंकर याने भरधाव वेगात मिक्सर ट्रक चालवत रस्त्याने पायी चाललेल्या ज्ञानेश्वर खांडेकर यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर खांडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





