प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – आयटीनगरी अशी ओळख असलेल्या हिंजवडी परिसरात काॅंकि्रट मिक्सरने दिलेल्या धडकेमुळे आणखी एका तरुणीचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी (दि. १०) सकाळी अकराच्या सुमारास माण रस्त्यांवर पांडव नगर येथे पिक अवर्समध्ये भारती राजेशकुमार मिश्रा (वय ३०, रा. थेरगाव) या मेकअप आर्टिस्ट महिलेला काँकि्रट मिक्सरने चिरडले. भारती मिश्रा ह्या आपल्या दुचाकी स्कुटी क्रमांक एमएच 14 इएक्स 1341 वरून माणच्या दिशेने जात असताना पांडव नगर भागातील ” स्ट्रीट ऑफ युरोप'” या मार्केट समोर सिमेंट मिक्सर वाहनाने महिलेच्या दुचाकीला धडक दिली. यात ती खाली पडल्याने मिक्सरचे चाक भारती मिश्रा यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर चालकाने मिक्सर गाडी घेऊन पलायन केले. परंतु हिंजवडी पोलिसांनी पलायन केलेल्या आरोपीला गाडी सह ताब्यात घेतले. याप्रकरणी मिक्सर चालक महंमद अल्ताफ अब्बास (वय २५, रा. वाघजाई मंदिरा समोर, चांदे) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयत महिलेचे नातेवाईक शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.