Katraj Accident – महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरच्या चाकाखाली सापडल्याने कात्रज डेअरी चौकात शुक्रवारी सकाळी दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. यामुळे तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कात्रज चौकातील वाहतूक व्यवस्थापन, देखभाल आणि जड वाहनांवरील नियंत्रणाबाबत पालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अपघातात प्ररिमा प्रधान ( ३८) यांचा मृत्यू झाला असून त्या कात्रज- कोंढवा रोडवरील श्रीज्वेल सोसायटीमध्ये वास्तव्यास होत्या. त्या जुपिटर दुचाकीवरुन जाताने हायवा डंपरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्या डंपरच्या पाठीमागील टायरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चढाच्या दिशेने जात होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत डंपर चालकाला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनमध्ये पाठविला आहे. भरधाव डंपर उठले जीवावर कात्रज डेअरी शेजारीच पालिकाचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. दिवसभरात दोनशेहून अधिक डंपर, हायवा वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच दुध डेअरीचे टँकर, पाण्याचे टँकर अशी वाहनेही पहाटे, सकाळी मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. कचरा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लिचड (ओला कचरा व गाळ) सांडत असल्याने रस्ता निसरडा झाला होतो. डंपर त्यामुळे अनेकदा दुचाकी घसरून अपघात होतात. त्यातच येथे तीव्र उतार असून जड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने सतत धोका असतो. वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचे कर्मचारी नियमितपणे तैनात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. अपघातानंतर तात्पुरते दोन कर्मचारी रस्त्यावर उभे केले जातात. यापूर्वीही याच चौकात डंपरखाली सापडून एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला होता. परिसरात मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. आरटीओला पत्र अपघातानंतर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र पाठवून संबंधित ठेकेदार मे. ग्लोबल संस्थेच्या सर्व वाहनांची फिटनेस तपासणी व कागदपत्रांची छाननी करण्याची विनंती केली. वर्क ऑर्डर देताना वाहतुकीचे नियम, अटींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पालिकेच्या म्हणण्यानुसार, पहाटे, सायंकाळी उशिरा कचरा केंद्रात वाहनांची ये-जा ठेवण्यात येते. यामुळे शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांना, नागरिकांना त्रास होतो. अपघातग्रस्त वाहन उरळी कांचन येथे कचरा उतरवून केंद्रात परतत होते, अशी माहिती वरिष्ठ आरोग्य निरीक्षक(धनकवडी क्षेत्रीय कार्यालय) श्रीपाद नाईक यांनी दिली. दुभाजक, रंबलर्सची मागणी प्रलंबित भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी कचरा हस्तांतरण केंद्राजवळील उतारावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रंबलर्स बसविण्याबाबत दोन-तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे. तसेच कचरा हस्तांतर केंद्रातील जड वाहतुकीच्या ठिकाणी रस्ता दुभाजक (डिव्हायडर) उभारण्याचीही मागणी केली आहे. वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच जड वाहनांना परवानगी असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक (वाहतूक) प्रियंका गोरे यांनी दिली.