पिचडांना अतिआत्मविश्वास नडला

अल्ताफ शेख
अकोले – अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक माजीमंत्री मधुकर पिचड यांच्या दृष्टीने डाव्या हाताचा मळ अशी होती, पण ती यापूर्वीची. मात्र यावेळी अनेक निष्ठावंत पिचडांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी उभे ठाकल्याने तसेच कारखाना कोण चालवू शकतो, हे दाखविण्याची एकही संधी कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी सोडली नाही. ऊसतोडणी मजूरांचा प्रश्न, कारखाना चालविण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ, कामगार आदी प्रश्नांची सोडवून करू कारखाना आम्हीच चालू शकतो, हे दाखवून दिले. मात्र या काळात पिचड काहीच बोलू शकले नाही. पिचड सभासदांना विश्वास देण्यास कमी पडले तर गायकर यांची रणनिती, व्युव्हरचना व सभासदांना दिलेला विश्वास, यामुळे शेतकरी समृद्धी मंडळाने निवडणूकीत एकतर्फी विजय मिळविला.
गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत असलेले मधुकरराव पिचड यांच्या राजकारणातील त्याचे सहकारी आज सोडून जात असताना पिचडांकडून मात्र कसलाही प्रयत्न होताना दिसत नाही. ज्यांनी अनेक वर्ष निवडणुकीतील धुरा संभाळली. राजकारणातील बारकावे पिचडांचे तालमीत शिकले ते आज विरोधात गेले. याबाबत पिचडांनीही आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.1992 ला स्थापनेपासून दोन वर्षाचा अपवाद वगळता 28 वर्ष पिचडांची सत्ता असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना पराभव स्वीकारावा लागला. याची अनेक कारणे आहेत, मात्र त्याची निरक्षणे करुन त्यात सुधारणा करणे पिचडांना गरजेचे आहे तर त्याचे विरोधात निवडणूक लढवत असलेल्या मंडळाचे प्रमुख कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी योग्य नियोजन सर्व नेत्याची मिळालेली प्रामाणिक साथ, स्वतःचा आत्मविश्वास व सभासदांमध्ये कारखाना चालविण्याबाबत निर्माण केलेला विश्वास आहे.
कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर गायकरांनी सर्वप्रथम पिचडाचे सर्व विरोधक व समविचारी पक्षाचे नेत्यांना एकत्रित केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ.किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, जि.प. सदस्य कैलासराव वाकचौरे, कॉंग्रेसचे नेते मधुकरराव नवले, आर.पी.आयचे विजयराव वाकचौरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, मा.क.प.चे डॉ. अजित नवले, कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शांताराम वाळुंज आदी समविचारी पक्षाचे नेत्याची मोट बांधून एकत्रित शेतकरी समृद्धी मंडळ उभे केले. यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन व सुचना केल्या. सगळ्याचा समतोल राखत नाराजी दूर करीत उमेदवारी जाहीर केली.
अजित पवार यांची सभा संपल्यानंतर सायंकाळी कारखाना निवडणूकीची प्रचार सांगता होत असताना सरकारने अतिवृष्टीमुळे राज्यातील सर्व निवडणुका तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा आदेश दिला त्याचा अध्यादेश काढला व निवडणूक थांबली. यावेळी सरकारच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी तात्काळ सीताराम गायकर यांनी औरंगाबाद खंडपीठ गाठले.व दावा दाखल केला. काही दिवस तारखा होऊन अकोलेत सद्या अतिवृष्टी नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन केवळ मतदान बाकी असल्याचे निदर्शनास आणुन दिल्याने न्यायालयाने दि. 25 सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्याचे आदेश दिले.
यावेळी शेतकरी समृद्धी मंडळाकडून निवडणूक पुढे ढकलण्याचे काम पिचडांनी सरकारच्या माध्यामातून केल्याचा आरोप केला गेला, मात्र याला पिचड व शेतकरी विकास मंडळाकडून साजेसे उत्तर दिले गेले नाही. त्यांनी निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी काही प्रयत्न केल्याचेही सभासदांना दिसले नाही. तसेच दि. 17 जूनला होणारी निवडणूक पुढे ढकलल्यानंतर अगस्तीचा हंगाम सुरु होणार असल्याने उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी आमदार डॉ.किरण लहामटे व इतर नेत्यांनाबरोबर घेऊन कारखाना हंगाम सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
अजित पवार, आ.बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कारखान्याला सहकार्य करण्याची मागणी केली. जिल्हा बॅंकेकडुन 68 कोटी रुपये कर्ज मिळवून कारखाना हंगाम सुरु करण्यासाठी टोळी ऍडव्हान्स, मशिनरी मेटेनन्स आदि कामे सुरु केली तर दुसरीकडं कारखान्याचे चेअरमन असलेले माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याकडून कोणतेही पाऊल उचलल्याचे सभासदांना दिसले नाही. त्यामुळे सभासदांना अगस्ती कारखाना सीताराम गायकर व त्याचे शेतकरी समृद्धी मंडळ चालवु शकते.हा विश्वास निर्माण झाला.
तसेच कारखाना निवडणूक पुढे ढकलली असतानांच्या काळातही समृद्धी मंडळाचे सर्व नेते व उमेदवार गावोगावी जाऊन सभासद मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. मतदारांना, सभासदांना कारखाना चालविण्याचा विश्वास देत होते, मात्र पिचडांचे शेतकरी विकास मंडळ या गोष्टीतही कमी पडले. शेवटच्या टप्प्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही शेतकरी विकास मंडळासाठी सभा घेतली, मात्र तेही सभासदांना विश्वास देऊ शकले नाही.
या निवडणूकीत शेतकरी विकास मंडळाचे वतीने फक्त सीताराम गायकर यानांच लक्ष्य करुन टिका केली. प्रचारात कारखान्याचे कर्जाचीच चर्चा झाली, मात्र कारखाना चालविण्यासाठीचे ध्येयधोरणे, उपाययोजना याबाबत बोलले गेले नाही. त्यातच निवडणूकीच्या दोन दिवस आधी गायकर यांच्या जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाबाबत न्यायालयाचा आलेला निर्णय हाही समृद्धी मंडळाला फायदा देवून गेला तर सुरूवातीला अटीतटीची असलेली निवडणूक सभासदांनी एकतर्फी करीत शेतकरी समृद्धी मंडळाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना मताधिक्याने विजयी केले.
तालुक्यातील प्रमुख मोठी असलेली सत्ता आता भाजप अर्थात पिचड गटाकडुन गेली. यातील झालेल्या चुका व कुठे कमी पडलो. याची चिंतन करुन भविष्यातील व्युव्हरचना ठरवावी लागेल, अन्यथा येणाऱ्या काळात अमृतसागर दुध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होणार आहे.
तसेच शेतकरी समृद्धी मंडळाने अगस्ती कारखान्यात सत्ता मिळवली, मात्र भविष्यात कारखाना चालविणे जिकरीचे काम आहे. पुढे खुप अडचणीचा काळ आहे. कारण कारखान्यावर मोठ्या प्रमाणात असलेले कर्ज, त्याची परतफेड, शेतकऱ्यांना एफ.आर.पी प्रमाणे दर तसेच भविष्यात तालुक्यात ऊस वाढवणे व गाळप वाढवणे, आदि अनेक प्रश्न उभे आहेत. तेव्हा सभासदांचा विश्वास मिळवला तो टिकवणे फार गरजेचे आहे.
================





