प्रभात वृत्तसेवा अकोले – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रयत्नानंतर अकोले तालुक्याचाही अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.अकोले तालुका वगळल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत होता. माजी आमदार वैभवराव पिचड यांनी नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. अकोले तालुक्यात यावर्षी अनेक वेळा अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात पडला. मुळा, भंडारदरा, आढळा, धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस मागील आठवड्यापर्यंत पडतच होता. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अकोले तालुक्यातील सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या नुकसान झाले. शेतात साठलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी पिके सडली. खरीप हंगाम हातचा गेला असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे अकोले तालुक्याचा समावेश अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत होण्याची गरज असल्याची मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही या बाबीस दुजोरा देत मुख्यमंत्र्यांकडे अकोले तालुक्यावर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली. पालकमंत्री विखे पाटील व माजी आमदार पिचड यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्याप्रमाणे आजच शासनाने अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीत समावेश करण्याचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे आधी संताप व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त व शेतकऱ्यांनी आदेश निघाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या आदेशाप्रमाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.