मविआच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी होणार? ‘या’ नेत्याने थेट तारीखच केली जाहीर

अकोले : राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. आज ही यात्रा अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले येथे धडकली. या यात्रेच्या जाहीर सभेतून बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मविआच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी होणार? याबाबत थेट तारीखच सांगितली.
काय म्हणाले जयंत पाटील?
महाविकास आघाडीच्या जागावाटपावर जयंत पाटील म्हणाले की, एक तारखेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्हाला आघाडी टिकवायची आहे. त्यामुळे आज उमेदवाराची घोषणा करणार नाही आणि भाषण सुरू असताना घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अकोलेचा उमेदवार कोण आहे हे अजूनही कळत नसेल तर त्याच्या बुद्धीची कीव येते, असे म्हणत अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी टोला लगावला. तर अमित भांगरे यांचे नाव न घेता एक प्रकारे जयंत पाटील यांनी उमेदवारीच जाहीर केली.
विरोधकांवर केली टीका
महाराष्ट्रातील 31 खासदार दिल्लीला आपण पाठवले. भाजपाला लक्षात आलंय आता त्यांचं सरकार येणार नाही. त्यामुळे तिजोरीचे दार उघडून पाहिजेत अशा घोषणा केल्या जात आहेत. सव्वा लाख कोटींचं कर्ज आम्हाला द्या, अशी मागणी सरकार आरबीआयकडे करत आहे. त्यांची लाडकी खुर्ची सोडेपर्यंत राज्यावर सव्वा 9 लाख कोटींचे कर्ज हे सरकार करणार आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.





