Pherne Phata: विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडा – डॉ. हर्षदीप कांबळे यांचे आवाहन

प्रभात वृत्तसेवा
लोणीकंद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत व शिस्तबद्धरीत्या पार पाडणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी परस्पर समन्वय साधत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.
हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसरास भेट देऊन १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, समाजकल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक संदीप गिल, पुणे शहर पोलीस उपायुक्त सोमय मुंडे,
उत्पादक शुल्क अधीक्षक अतुल कानडे, समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, गट विकास अधिकारी शेखर शेलार, बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच विजयस्तंभ स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. कांबळे म्हणाले की, देशभरातून लाखो अनुयायी १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादनासाठी येतात. यंदा गेल्या वर्षीपेक्षा गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन करावे. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घेत सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या मागण्यांबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे प्राप्त प्रस्तावांना आजच मान्यता दिली जाईल, तसेच आणखी काही मागण्या असल्यास तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास दिलेल्या भेटीस सन २०२७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता दीर्घकालीन नियोजन आणि पायाभूत सुविधांची तयारी आतापासूनच करावी, असेही डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले.
सर्वंकष पूर्वतयारीचा आढावा
बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीची माहिती देण्यात आली. यामध्ये विजयस्तंभ सजावट, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र व औषधसाठा, रुग्णालयांतील खाटांचे आरक्षण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे टँकर, घंटागाडी, हिरकणी कक्ष, बसेसचे नियोजन, विद्युत व्यवस्था, पुस्तक विक्री स्टॉल, शौचालये, वाहनतळ, रस्ते दुरुस्ती, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही,
आपत्कालीन प्रतिसाद, समाजमाध्यमांचे सनियंत्रण, नियंत्रण कक्ष तसेच बिबट व सर्प प्राणी व्यवस्थापन यांचा समावेश आहे. याठिकाणी सुरू असलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करत ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सामाजिक न्याय मंत्र्यांना कळविण्यात येईल, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.





