Pharmacy Admission : फार्मसी प्रवेशाचा तिसरा अंक! २० हजार जागांसाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस ; ‘या’ तारखा लक्षात ठेवा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – फार्मसी पदवी प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन फेऱ्यांमध्ये तब्बल २४,८०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, उर्वरित २०,३६३ जागांसाठी चुरस निर्माण झाली आहे.फार्मसी अभ्यासक्रमाच्या ४४,२८७ जागांसाठी ५५,११६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ३८,४६२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवले, तर पहिल्या फेरीत १६,६७० व दुसऱ्या फेरीत ८,१३४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. भारतीय औषधनिर्माण परिषदेकडून (पीसीआय) काही महाविद्यालयांना मान्यता देण्यास झालेला विलंब आणि काही संस्थांमधील पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवेश प्रक्रियेला प्रारंभी अडथळे आले. मात्र आता प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे.
तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक..
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पसंतीक्रम भरता येणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी तिसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध होईल. यादीत नाव असलेल्यांनी २८ ते ३० ऑक्टोबरमध्ये महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा. तिसऱ्या फेरीनंतर रिक्त जागांची यादी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. १ ते १० नोव्हेंबर दरम्यान चौथी फेरी पार पडेल. संस्थात्मक प्रवेश फेरी ११ ते १७ नोव्हेंबरमध्ये होणार आहे.





