पिंपरी, (प्रतिनिधी) – गतविजेता पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) संघ हॉकी महाराष्ट्र आयोजित व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतर-विभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. उपविजेता रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघानेही (आरएसपीबी) अंतिम 8 संघांतील स्थान निश्चित केले. मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथील स्पर्धेत रविवार पहिल्या सामन्यात पीएसपीबीने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसवर (सीबीडीटी) 5-4 असा विजय मिळवला. त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. सर्वाधिक 9 गुणांसह त्यांनी अ गटामध्ये अव्वल स्थान कायम राखले. ब गटामध्ये, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने (आरएसपीबी) स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्डावर मात करताना तिसरा विजय मिळवला. या विजयासह आरएसपीबीने 3 सामन्यांतून त्यांची गुणसंख्या 9 वर नेली. अन्य सामन्यांमध्ये, अ गटामध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीपीबी) सेंट्रल हॉकी संघाने सेंट्रल सेक्रेटरिएटविरुद्ध 3-3 अशी बरोबरी साधली.