नऊ मंत्र्यांना अपात्र ठरवण्यासाठी राष्ट्रवादीची याचिका ! विधानसभा अध्यक्षांकडे तातडीने घेतली धाव

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून फुटून काल राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यासह सर्व नऊ जणांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यांना पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र घोषित करावे अशी मागणी त्यांनी या याचिकेत करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री उशिरा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन ही याचिका त्यांना सादर केली. नार्वेकर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता याचिका मिळाल्याची पुष्टी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, देशाच्या निवडणूक आयोगाला एक ई-मेल देखील पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेच असल्याची माहिती देण्यात आली आहे, तसेच फुटीर गटाच्या कोणत्याही मागणीवर निर्णय घेण्यापुर्वी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुतांशी कार्यकर्ते आणि पदाधिकारीही पक्षाबरोबरच आहेत असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. जे आमदार अजित पवारांबरोबर आहेत असे सांगितले गेले आहे त्यातील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका करण्यापुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षते खाली झाली. त्यात या नऊ मंत्र्यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवणारा अहवाल पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सादर करण्यात आला.





