Gen Z Protests in Peru : नेपाळ आणि मादागास्करनंतर आता लॅटिन अमेरिकेतील पेरू देश Gen Z च्या आंदोलनाच्या ज्वाळांत सापडला आहे. राष्ट्राध्यक्ष जोस जेरी यांनी गुरुवारी राजीनामा देण्यास ठाम नकार दिला, तर देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हिंसक आंदोलनांमध्ये सुमारे 100 लोक जखमी झाले असून, त्यात 80 पोलीस अधिकारी आणि 10 पत्रकारांचा समावेश आहे. आंदोलकाचा मृत्यू गोळीबारामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे. का सुरू झाले आंदोलन? राष्ट्राध्यक्ष जोस जेरी यांनी संसदेला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले, “माझी जबाबदारी देशातील स्थैर्य राखण्याची आहे आणि ती मी पार पाडणारच,” असं ते म्हणाले. त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष अधिकार मागण्याची घोषणाही केली. सुमारे एक महिन्यापूर्वी सुरू झालेले हे आंदोलन सुरुवातीला उत्तम पगार आणि पेन्शन यांसाठी होतं; परंतु आता हे आंदोलन देशातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दशकांपासून चालत आलेल्या निराशेचा विरोध दर्शवू लागलं आहे. गेल्या दहा वर्षांत पेरूमध्ये सात राष्ट्राध्यक्ष बदलले असून, जेरी सत्तेवर आल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या आणि इतर खासदारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हिंसक झाले आंदोलन : पेरूच्या प्रॉसिक्यूशन ऑफिसने 32 वर्षीय हिप-हॉप गायक एडुआर्डो रुईझ यांच्या हत्येची चौकशी सुरू केली आहे. आंदोलक रुईझ यांना निदर्शनादरम्यान गोळी लागल्याचे सांगण्यात आले आहे. किमान 24 आंदोलक आणि 80 पोलीस जखमी झाले आहेत. तर, 6 पत्रकार गोळीबारात जखमी झाले आणि इतर 4 जणांना पोलिसांच्या मारहाणीचा फटका बसला. राष्ट्राध्यक्ष जेरी यांनी आंदोलकाच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. जागतिक स्वरूप घेत असलेले Gen Z आंदोलन : पेरूमधील हे आंदोलन आता एका जागतिक प्रवाहाचा भाग बनले आहे, ज्यात युवक आपल्या सरकारांविरोधात असंतोष व्यक्त करत आहेत. या आंदोलनाची सुरुवात नेपाळमधून झाली आणि आता ते फिलिपिन्स, इंडोनेशिया, केन्या, मोरोक्को, मादागास्कर आणि पेरूपर्यंत पसरले आहे. अलीकडेच पेरूच्या संसदेनं माजी राष्ट्राध्यक्षा दीना बोलुआर्ते यांना पदावरून हटवलं होतं, कारण त्या गुन्हेगारी नियंत्रण आणि आंदोलनांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्या होत्या. कोण आहेत नवीन राष्ट्राध्यक्ष जेरी? ३८ वर्षीय ‘जोस जेरी’, जे पूर्वी संसद अध्यक्ष होते, त्यांनी पदभार स्वीकारताना देशातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी पूर्व न्यायाधीश अर्नेस्टो आल्वारेझ यांना पंतप्रधानपदी नियुक्त केलं. आल्वारेझ यांनी यापूर्वी म्हटलं होतं की, “पेरूचं Gen Z म्हणजे लोकशाही काबीज करण्यासाठी उभं राहिलेलं एक टोळकं आहे.” त्यांचं म्हणणं होतं की हे काही सर्वसामान्य मेहनती युवकांचं प्रतिनिधित्व करत नाहीत. जेरी आणि त्यांच्या सरकारवर आधीपासूनच वाद निर्माण झाले आहेत, कारण त्यांच्यावर बलात्काराच्या आरोपाची चौकशी सुरू आहे.